Join us  

विरोधकांकडून दिशाभूल, सरकारची चर्चेची तयारी; अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 8:58 AM

विरोधक गैरसमज पसरवून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आम्ही खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडणारे लोक नाही. अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेणार आहोत. विरोधकांंनी चहापानावर बहिष्कार टाकताना दिलेल्या पत्रात नवीन मुद्दे नाहीत, त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असे सांगत विरोधक लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

संविधान बदलणार असे खोटे नरेटिव्ह विरोधकांनी पसरवले. त्याद्वारे त्यांना क्षणिक आनंद मिळाला, पण एवढे करूनही काँग्रेसला फक्त ९९ जागा मिळाल्या.  ४०-५०-९९ या वेगाने काँग्रेसला ३०० पर्यंत पोहोचायला आणखी किती वर्षे लागतील, असा सवाल करत गिरे तो भी टांग उपर अशी विरोधकांची अवस्था असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे म्हणतात, हे सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आहे, पण निरोप द्यायला त्यांनी सभागृहात यायला हवे की, फेसबुकवरून निरोप देणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

पाठ्यपुस्तकात ‘तो’ श्लोक नाही  : अजित पवार विरोधकांनी दिलेल्या पत्रात मनुस्मृतीतील श्लोकाचा मुद्दा उपस्थित केला आहे, परंतु, तसा श्लोक पाठ्यपुस्तकात नाही. जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह सेट करण्यासाठी विरोधक गैरसमज पसरवून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली. 

विरोधकांचा पर्दाफाश करू : देवेंद्र फडणवीस 

  • खोटे नरेटिव्ह तयार करून थोडी मते मिळाल्यानंतर आता खोटेच बोलायचे अशा मानसिकतेत विरोधक गेले आहेत. त्याचा पर्दाफाश अधिवेशनात करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत दिला. 
  • वैधानिक विकास महामंडळ त्यांनी गुंडाळले, आम्ही केंद्राला त्याबाबत प्रस्ताव पाठवला. मराठवाडा वॉटरग्रीड बंद मविआ सरकारने केले आणि ते आम्हाला विचारताहेत वॉटर ग्रीडचे काय झाले, आम्ही हा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे.
  • सर्वांत जास्त पेपरफुटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली, असे सांगत फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवारमहायुती