प्रिय डबलडेकर,
विषय : वातानुकूलित डबल डेकर सेवेत रुजू होत असताना जुन्या नॉन एसी डबल डेकर आजपासून निवृत्त!
सप्रेम नमस्कार!
तू आज सेवा निवृत्त होत आहेस असं कळलं. इथून पुढे तू अस्तित्त्वात नसलीस तरी जुन्या डबल डेकरने प्रवास केलेल्या लाखो प्रवाशांच्या आठवणीत कायम राहशील! आताच्या मुलांनी खेळण्यातली डबल डेकर पाहिली आहे, पण आमच्या सारख्या अनेक मुंबईकर, नॉन मुंबईकरांनी तुझा प्रवास केला आहे. उलटपक्षी मुंबईत जाऊन डबल डेकर ने प्रवास न करणे हे तर पाप म्हटलं जायचं. एवढी तुझी ख्याती होती, आहे आणि कायम राहील. तुझ्या जागी आता नवीन वातानुकूलित डबल डेकर येणार आहे असं कळलं. पण तुझ्या बसमध्ये वरच्या मजल्यावर पहिल्या खिडकीत बसल्यावर येणारा वाऱ्याचा झोत पाहता वातानुकूलित बस मध्ये ती मजा अनुभवता येणार नाही हे दुर्दैव! काही गोष्टी नैसर्गिकच छान वाटतात. तू त्यापैकी एक होतीस. ८६ वर्ष अथक सेवा देऊन आज तुला निरोप देताना मन व्याकुळ होतंय, पण रडत रडत तुला टाटा करायचं नाहीये, म्हणून काही मजेशीर आठवणी शेअर करते.
परळला राहत असताना डबल डेकरने अनेकदा प्रवास केला. बस स्टॉपवर बसची वाट बघताना डबल डेकर आली की आनंदही डबल व्हायचा. 'वर जा, भरपूर जागा आहे', म्हणत कंडक्टर प्रवाशांना सदेही वर पाठवायचा! त्यातही पहिल्या खिडकीची जागा मोकळी मिळाली तर मज्जाच मजा! पुढून आणि बाजूने मुंबईचे विहंगम दृष्य पाहण्यात तेवढाच खिडकीभर आनंद! पण बस फुल पॅक असताना वर पोहोचेपर्यंत दोन स्टॉप निघून जायचे. अशातच ड्रायव्हरने मध्येच करकचून ब्रेक मारला की प्रवाशांचा मायकल जॅक्सन व्हायचा. सिंगल बसचं दार तस निमुळतं, एकावेळी एकाने चढण्याचं, पण डबल डेकरचं दार म्हणजे राक्षसासारखा आ वासलेला असायचा. त्यावरून निसटून स्टॉपआधीच आपण उतरू की काय अशी अनेकदा भीती वाटायची. शिवाय एखाद्या सर्कलला वळण घेताना डबलडेकर अशी काही कलंडायची की पोटात गोळा यायचा. क्षणभर टायटॅनिकचा फील यायचा. स्वतःचा डोलारा सांभाळत बस पुन्हा वेग घ्यायची. मरीन लाईन्स वर छत नसलेली, परदेशी प्रवाशांना मुंबई दर्शन घडवणारी डबलडेकरपण अनेकदा पाहिली, पण त्यात कधी बसणं झालं नाही. आज नॉन एसी डबल डेकर मुंबईच्या इतिहासात जमा होतेय असं कळलं! पण डबल डेकरचा वरचा भाग ड्रायव्हर शिवाय कसा काय चालायचा हा बालिश प्रश्न अनुत्तरितच राहिला!
असो,
मिस यु डबलडेकर
तुझी एक्स प्रवासी : ज्योत्स्ना गाडगीळ