आणखी ३२ उत्तरपत्रिका झाल्या गहाळ
By admin | Published: June 12, 2016 04:37 AM2016-06-12T04:37:15+5:302016-06-12T04:37:15+5:30
विद्यापीठ उत्तरपत्रिका घोटाळ्यातील ३१ उत्तरपत्रिकांचा शोध सुरु असताना यात आणखी ३२ उत्तरपत्रिका गहाळ असल्याची माहिती समोर आली. विद्यापिठाकडून मागविण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांच्या
मुंबई : विद्यापीठ उत्तरपत्रिका घोटाळ्यातील ३१ उत्तरपत्रिकांचा शोध सुरु असताना यात आणखी ३२ उत्तरपत्रिका गहाळ असल्याची माहिती समोर आली. विद्यापिठाकडून मागविण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांच्या चौकशी अहवालातून ही बाब उघड झाली. त्यामुळे ६३ उत्तरपत्रिकांचा शोध भांडुप पोलीस घेत आहेत.
मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांचा घोटाळा भांडुुप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या पथकाने उघडकीस आणला. कोऱ्या उत्तरपत्रिका काढून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना घरी सोडविण्यासाठी देणाऱ्या या रॅकेटचे बिंग फोडत, भांडुप पोलिसांनी मिथुन मोरे, चिमण सोलंकी, संजय कुंभार, दिनकर म्हात्रे हे चौघे शिपाई, संदीप जाधव, रोहन मोरे हे कारकून आणि कस्टोडियन प्रभाकर वझे यांच्या अटक केली. सध्या या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९६ उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे या प्रकरणातील ३१ उत्तरपत्रिकांचा शोध सुरू होता. त्यात आता नव्याने ३२ उत्तरपत्रिकांची भर पडली आहे.
या प्रकरणात नवी मुंबईच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०१५ पासून आरोपींकडून हा प्रकार सुरू आहे.
या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली. या प्रकरणातील दोन फरार शिपायांचाही शोध सुरु असल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गुणपत्रिकांमध्येही फेरफार
- मास्टरमाइंड मिथून मोरे याने विद्यार्थ्यांच्या निकालपत्रांमध्येही फेरफार केल्याचे उघडकीस आले. नापास असतानाही उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका मोरे तयार करून देत होता. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी अटक केलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या चौकशीतून ही बाब उघड झाली.
- अटक विद्यार्थ्याला गणित विषयात १०० पैकी २८ गुण मिळाले होते. असे असतानाही त्यांनी उत्तीर्ण असल्याची बनावट मार्कशिट तयार करुन पदवीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात सादर केली. संबंधित विद्यालयाने हे निकालपत्र विद्यापिठात तपासणीसाठी पाठविले होते. त्यातून या विद्यार्थ्याचे याचे बिंग फुटले.