गहाळ झालेले ५८ लाखांचे मोबाईल केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:07 AM2021-09-24T04:07:12+5:302021-09-24T04:07:12+5:30
सायबर पोलिसांची मोठी कामगिरी : विविध २८५ मोबाईलचा घेतला शिताफीने शोध लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही ...
सायबर पोलिसांची मोठी कामगिरी : विविध २८५ मोबाईलचा घेतला शिताफीने शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या तब्बल २८५ मोबाईलचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने शोध घेतला आहे. त्याची किंमत ५८ लाख ५ हजार ६२० रुपये इतकी असून बुधवारी हे मोबाईल संबंधित मालकांना परत देण्यात आले.
गुन्हे अन्वेषण विभागाचे सह आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोविलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून देश-परदेशातून हे मोबाईल शोधून काढले आहेत.
नागरिकांची नित्याची गरज बनलेल्या मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांत दाखल मोबाईल गहाळच्या तक्रारी एकत्र करून त्याबाबत शोध घेण्यात येत होता. मोबाईलचे आयएमआय नंबरच्या आधारे तांत्रिक कौशल्याच्या साहाय्याने ते सध्या वापरात असलेल्या ठावठिकाणा शोधला. संबंधिताकडून तो ताब्यात घेण्यात आला. सहायक आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक संजय गोविलकर, निरीक्षक सविता शिंदे, निरीक्षक मौसमी पाटील, उपनिरीक्षक सुयोग अमृतकर यांनी या मोबाईलचा शोध घेऊन त्यांच्या मूळ मालकांशी संपर्क साधला.
-------------------
दुबईतून मोबाईल मिळविला
सायबर पोलिसांनी २८५ मोबाईल राज्यासह मुंबईसह उत्तरप्रदेश, राज्स्थान, बिहार, कोलकाता आदी राज्यातून मिळविले असून एका मोबाईलचा दुबईतून शोधण्यात आला. तो वापरत असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधून मागविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
---------------------
चोरी ऐवजी गहाळची नोंद
पोलीस ठाण्यात सरासपणे मोबाईल चोरी ऐवजी हरवल्याची नोंद घेऊन तक्रारदाराला प्रमाणपत्र दिले जाते. पोलिसांनी जमा केलेले बहुतांश मोबाईल त्यातलेच आहेत. जर त्याची नोंद चोरीची म्हणून झाली असती तर तो बाळगणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य झाले असते. पण ‘मिसिंग’मुळे त्यांना कारवाई विना सोडून द्यावे लागले.