Join us

कुमारस्वामींवर आणखी एक संकट, गायब आमदार मुंबईतील रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 1:04 PM

विधानसभेतील बहुमत चाचणीदरम्यान श्रीमंत पाटील गैरहजर होण्याची शक्यता

मुंबई : जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरु आहे. बंडखोरांमुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारवर संकट ओढावले असून आज विधानसभेत बहुमत चाचणी घेण्यात येत आहे. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेत बंडखोर आमदार दाखल झाले नाहीत. बंडखोर आमदार सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये आहेत. काल रात्रीपासून मुंबईत असलेल्या बंडखोरांपैकी एक काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील गायब असल्याचे बोलले जात होते. 

बुधवारी रात्री काँग्रेसकडून तक्रार दाखल केली होती की हॉटेलमधून एक आमदार गायब झाला आहे. ही तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र,  आज कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी सुरु झाल्यानंतर आमदार श्रीमंत पाटील एक फोटो समोर आला आहे. श्रीमंत पाटील रात्री उशिरा मुंबईतील एका रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे विधानसभेतील बहुमत चाचणीदरम्यान श्रीमंत पाटील गैरहजर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   

दरम्यान, आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची विधानसभेत अग्निपरीक्षा सुरु आहे. कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जनता दल (एस) आणि काँग्रेसचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. बहुमत सिद्ध केले नाही तर कर्नाटकातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. 225 विधानसभा सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी 113 मतांची गरज आहे. परंतु 15 आमदारांच्या बंडखोरीमुळे जनता दल (एस) आणि काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. 

टॅग्स :कर्नाटक राजकारणकर्नाटकमुंबईहॉस्पिटल