Join us

मुंबईतील मूषकांचा संहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 4:20 AM

सहा महिन्यांत २ लाख मूषकांचा ताबा; लेप्टो, प्लेगवरील नियंत्रणासाठी पालिकेची मोहीम

मुंबई : मुंबईकरांना लेप्टोस्पायरोसिस, प्लेगपासून वाचविण्यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक मूषक विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी ते जून २०१८ या ६ महिन्यांच्या कालावधीत २ लाख ११ हजार ७०५ उंदरांना ताब्यात घेऊन त्यांचे नियंत्रण करण्यात आले आहे.प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या रोगांच्या प्रसारास उंदीर, घुशी कारणीभूत ठरतात. उंदराच्या एका जोडीपासून वर्षभरात १५ हजारांचा कुटुंब कबिला तयार होत असल्याने, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मूषक नियंत्रण हे एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न नियमितपणे करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून जानेवारी ते जून २०१८ या ६ महिन्यांच्या कालावधीत २ लाख ११ हजार ७०५ उंदरांचे नियंत्रण करण्यात आले आहे.महापालिकेच्या कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेप्टोस्पायरोसिस हा रोग लेप्टोस्पायरा (स्पायराकिट्स) या सूक्ष्म जंतुंमुळे होतो. हे सूक्ष्म जंतू उंदरासह अनेक प्रकारच्या चतुष्पाद प्राण्यांच्या मूत्राद्वारे जमिनीवर, अन्नपदार्थांवर अथवा पाण्यात मिसळले जाऊ शकतात. लेप्टोस्पायरोसिसने बाधित असलेल्या प्राण्याचे मलमूत्र माती, पाणी, अन्न, पेयजले इत्यादींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेद्वारे अथवा तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात, तर झिनॉपसिला चिओपिस या पिसवा उंदीर-घुशींच्या केसात आढळतात. या पिसवांमार्फत प्लेगची लागण होते.स्वच्छतेचा अभाव, उघड्यावर अन्नपदार्थ विकणारे व कुठेही कचरा फेकण्याची सवय, त्यातून उंदरांना सहजपणे मिळणारे अन्न, यामुळे उंदरांची संख्या वाढण्यास हातभार लागतो. यावर नियंत्रणासाठी मुंबईकरांनी मूषक नियंत्रण चतु:सूत्रीचा गांभीर्याने अवलंब करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत नारिंग्रेकर यांनी व्यक्त केले.काय आहे मूषक नियंत्रण चतु:सूत्री?उंदरांचा घरात प्रवेश होऊ नये, याची खबरदारी घेणे.उंदरांना आसरा मिळणार नाही, याची काळजी घेणे.उंदरांना खाद्य मिळणार नाही याची दक्षता घेणे.उंदरांना मारणे.असे मिळविले जाते मूषकांवर नियंत्रणउंदीर पकडण्यासाठी सापळे लावणे.विषारी गोळ्या टाकणे.बिळांमध्ये विषारी गोळ्यांनी वाफारणी करणे.रात्रीच्या वेळी काठीने उंदीर मारणे.मुंबईकरांनो, सावधान!सस्तन प्राण्यामध्ये मोडणाऱ्या उंदीर वा घुशी यांचे आयुर्मान सुमारे १८ महिन्यांचे असते.गर्भधारणेनंतर साधारणपणे २१ ते २२ दिवसांत मादी उंदीर पिल्लांना जन्म देते.एका वेळेस साधारणपणे ५ ते १४ पिल्लांना ती जन्म देते.जन्मलेली पिल्ले ५ आठवड्यांत प्रजननक्षम होऊन, तीदेखील नव्या पिल्लांना जन्म देतात.याप्रकारे त्यांची संख्या कित्येक पटीत वाढत जाते.यानुसार, साधारणपणे एका वर्षात उंदराच्या एका जोडीपासून अंदाजे १५ हजारांचा कुटुंब कबिला तयार होऊ शकतो.हा कबिला लेप्टो, प्लेग पसरवून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ करू शकतो.

टॅग्स :मुंबई