लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) महत्त्व पटविण्यासाठी गेल्या महिन्यात तत्परतेने, महापालिकेला ६४७ कोटींचा धनादेश देणाºया राज्य सरकारने दुसरा हफ्ता मात्र चुकविला आहे. प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला धनादेश महापालिकेला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी दिले होते, परंतु ७ आॅगस्ट उजाडला, तरी अद्याप याबाबत कोणत्याच हालचाली राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नाहीत.महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत असलेला जकात कर रद्द करून, जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेला जकात कराच्या स्वरूपात दरवर्षी मिळणाºया सात हजार कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. १ जुलैपासून जकात कर बंद झाल्याने, महापालिकेला राज्य सरकारकडून नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यानुसार, या नुकसानभरपाईचा पहिला हफ्ता गेल्या महिन्याच्या ५ तारखेला पालिका प्रशासनाला मिळाला. यासाठी महापालिका मुख्यालयात हा धनादेश सोहळा पार पडला होता.महापालिकेला नुकसानभरपाई म्हणून ६४७.३४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात यापुढचे सर्व हप्ते प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी दिले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा धनादेश, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे सुपुर्द केला होता. मात्र, दुसºयाच महिन्यात ही डेडलाइन चुकली.
महापालिकेचा मोबदला चुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:49 AM