मुंबईतील बेपत्ता महिला सापडली पाकिस्तानात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 05:47 AM2022-08-03T05:47:08+5:302022-08-03T05:47:19+5:30
सोशल मीडियाची कमाल; २० वर्षांपूर्वी गेली होती परदेशात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुमारे २० वर्षांपूर्वी परदेशात कामासाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेली मुंबईतील महिला सोशल मीडियाच्या मदतीने पाकिस्तानात सापडली आहे.
पाकिस्तानातील हैदराबाद शहरात राहणाऱ्या हमीदा बानो (वय ७०) या २००२ मध्ये मुंबईहून दुबईत घरकाम करण्यासाठी गेल्या होत्या. अलीकडेच हमीदा बानोने सोशल मीडियाद्वारे मुंबईतील कुर्ला येथील तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. यामुळे त्यांच्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सामाजिक कार्यकर्त्याने केली मदत
हमीदा बानोच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील वलीउल्लाह मारूफ या सामाजिक कार्यकर्त्याने हमीदा बानोची भेट घेतली. एका एजंटने दुबईत काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन २० वर्षांपूर्वी फसवणूक केली आणि दुबई सांगून पाकिस्तानला पाठविले, असे हमीदाने त्याला सांगितले. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर बानो सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात राहू लागली आणि तिथल्या स्थानिक तरुणाशी तिचे लग्न झाले. पुढे पतीचा मृत्यू झाला. आता ती आपल्या मुलासोबत राहते.
भारत सरकारकडे मदतीचे आवाहन
याआधी बानो घरकामासाठी कतारलाही गेली होती, असेही यास्मिनने सांगितले. आई जिवंत आणि सुरक्षित आहे याचा तिला आनंद आहे. आईला परत आणण्यासाठी भारत सरकारने आम्हाला मदत करावी, अशी आमची इच्छा आहे, असे म्हणत तिने भारत सरकारकडे मदत करण्याची विनंती केली आहे. यास्मिनच्या कुटुंबीयांनी हमीदा बानो यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयात जाण्याची योजनाही आखली आहे.
मुंबईत मुलीपर्यंत
पोहोचला व्हिडिओ
n अलीकडेच मारूफ यांनी तिची कहाणी हमीदाच्या मुंबईतील परिचितांपर्यंत पोहोचेल या आशेने यू-ट्यूबवर पोस्ट केली. अखेर हा व्हिडिओ खफलान शेख नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला.
n त्याने तो त्याच्या सोशल मीडिया ग्रुपवर पाठविला, त्यानंतर तो कुर्ला येथे राहणाऱ्या हमीदा बानोची मुलगी यास्मिन बशीर शेखपर्यंत पोहोचला. व्हिडिओ बघताच यास्मिनने आईला ओळखले.
n यास्मिन म्हणाली, “माझी आई २००२ मध्ये एजंटच्या माध्यमातून दुबईत घरकामासाठी भारत सोडून गेली होती. मात्र, एजंटच्या निष्काळजीपणामुळे ती पाकिस्तानात पोहोचली.
n आम्हाला तिचा ठावठिकाणा माहीत नव्हता. त्याच एजंटद्वारे फक्त एकदाच तिच्याशी संपर्क साधता आला. पण इतके दिवस आम्हाला ती कुठे आहे हे माहिती नव्हते.