Join us

भाजपाध्यक्ष चंद्रकांतदादांनी अप्रत्यक्षपणे बारामतीचा निकालच जाहीर करून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 4:06 PM

विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडीसह इतरही राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर, सर्वच राजकीय पक्षांनी आनंद व्यक्त करत लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सावाला सुरुवात झाल्याचं म्हटलंय. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना 220 जागांवर महायुतीला विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडीसह इतरही राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. उमेदवारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, काँग्रेसची 100 उमेदवारांची यादी तयार आहे. युतीचंही लवकरच फिक्स होईल, असं सांगण्यात येतंय. निवडणुकांच्या घोषणेनंतर चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचंच सरकार येईल, असं म्हटलं. तसेच 220 जागा आम्ही निश्चित जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. पण, बारामतीच्या जागेवरील विजयाबद्दल त्यांनी अनिश्चितता व्यक्त केली. 

लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीला तळ ठोकणार का? असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, काही मतदारसंघ हे तेथील नेत्यांनी अतिशय मजबूत केले आहेत. त्यामध्ये बारामती मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाही, पण 2024 साठी आम्ही बारामतीचे लक्ष्य ठेवल्याचं पाटील यांनी सांगितले. यावरुन, एकप्रकारे पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत पराभवांच्या यादीत बारामती अग्रस्थानी ठेवल्याचं दिसून येतंय. तर, बारामतीचा पराभव निश्चित मानलाय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  

टॅग्स :बारामतीबारामतीचंद्रकांत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार