Join us  

मिशन २०२४ चा अहवाल भाजपसाठी धक्कादायक; आता विनोद तावडेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:29 PM

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात चाचपणी सुरु आहे.

मुंबई - राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र, भाजपने मिशन २०२४ चं रणशिंग फुंकलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा अनेक राज्यांचे दौरे करत आहेत. कोणत्याही परिस्थिती भाजपला पुन्हा एकदा २०२४ मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना विराजमान करायचं आहे. त्यासाठी, आत्तापासूनच भाजपचं स्थानिक पातळीवर कामकाज सुरू झालं आहे. त्याच अनुषंगाने भाजपकडून चाचपणी आणि पक्षमेळावे सुरू आहेत. मात्र, भाजपचे वरिष्ठ नेते आणि सरचिटणीस विनोद तावडे यांच्या एका अहवालातून महाराष्ट्रासाठी भाजपला धोक्याची घंटा दर्शविण्यात आलीय. आता, या अहवालासंदर्भात स्वत: तावडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.  

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात चाचपणी सुरु आहे. भाजप पक्षात विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून प्रत्येक राज्यांतील परिस्थितीचा अभ्यास करण्यात आल्याचे वृत्त होते. या अभ्यासानंतर समितीकडून अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातील माहिती भाजपसाठी चांगली नाही. त्यामुळे भाजप पक्ष आता पुन्हा जोमाने कामाला लागला आहे. आगामी निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागांवर यश मिळवण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, असे वृत्त माध्यमांत झळकले होते. त्यानंतर, आता स्वत: विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं असून मी कुठलाही अहवाल सादर केला नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. 

दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे, ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे, असे विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. त्यामुळे, तावडेंचा अहवाल खरा की खोटा या चर्चेला भाजपकडून सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. 

विनोद तावडे यांच्या समितीच्या अहवालात काय?

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार असा अहवाल समोर आला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने हा अहवाल दिला. २०१९ च्या तुलनेत यावेळी भाजपच्या जागा घटणार. भाजपला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात फटका बसणार, असाही उल्लेख विनोद तावडे यांच्या समितीच्या अहवालात करण्यात आला आहे. 

टॅग्स :विनोद तावडेभाजपाशिवसेनानिवडणूक