मुंबई : कमी पटसंख्येत वाढ करण्यासाठी मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा मागच्या शैक्षणिक वर्षात राबविलेला ‘एकच लक्ष्य एक लक्ष’ पॅटर्न हिट ठरला असून यंदाही मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने तो राबविण्यास सुरुवात केली आहे. मागील शैक्षणिक वर्षाच्या पटसंख्येत १ लाख वाढीव प्रवेश करण्यासाठी २० मार्चपासून पालिका शिक्षण विभागाकडून मिशन ॲडमिशन मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे प्रवेश वर्ग, पहिली, पाचवी व नववी यात वर्गोन्नतीने आलेल्या मागील वर्षाच्या पटाच्या तुलनेत वाढ होणे आवश्यक असल्याचा मिशन ॲडमिशनचा मुख्य उद्देश असणार आहे.
ही मोहीम राबविण्यासाठी पालिका शिक्षण विभागाने शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शेवटच्या इयत्तांचे शाळा सोडल्याचे दाखले जवळच्या शाळांमध्ये निकालानंतर २७ एप्रिलपर्यंत हस्तांतरित होणे आवश्यक असणार आहे. बालवाडीपासून ते माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांची मुंबई पब्लिक स्कूलमधून गळती होणार नाही याची विशेष काळजी घ्या अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
नवीन शाळा प्रवेशाचे ध्येय निश्चित करताना विविध उपाययोजना करून एका शिक्षकाने किमान १० नवीन प्रवेश करून देण्याचे ध्येय ठेवणे आवश्यक असणार आहे. नवीन प्रवेशासाठी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी शाळा प्रवेशांसंदर्भात स्टॉल लावणे, पथनाट्य सादर करणे असे कार्यक्रमही होणार आहेत. शिवाय प्रवेशाचा ऑनलाइन गुगल फॉर्म उपलब्ध करून देणे, गृहभेटी देणे, शालेय व्यवस्थापन व पालक सभा घेऊन प्रवेशासाठी पालकांना प्रोत्साहित करण्याचे उपक्रमही शाळा प्रशासन हाती घेऊ शकणार आहे, असे सांगण्यात आले.
शिक्षण विभाग करणार सोशल मीडियाचा वापर
यंदा प्रवेशासाठी पालिका शिक्षण विभाग ऑनलाइन आणि सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करणार आहे. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी क्युअर कोड, लिंक, हेल्पलाइन नंबर अशा तीन प्रकारे सुविधा देणार आहे. पालकांना हव्या असलेल्या प्रवेशाचे ठिकाण, प्रवेशाची इयत्ता, प्रवेशाचे माध्यम इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे. बॅनर व हस्तपत्रिका यामध्ये देखील क्युअर कोड लिंक व हेल्पलाइन नंबर यांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र या सगळ्यात प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची नेहमीची पद्धतीही सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या दरम्यान या माहितीद्वारे प्रवेशासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षक , मुख्याध्यपकांनाच सन्मानही करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.