मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाचा दुसरा टप्पा भरण्यासाठी तब्ब्ल १ लाख २० हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना आणखी २ ते ३ दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी किंवा गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.
दहावीची परीक्षा दिलेल्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरण्याची मुभा देण्यात आली आहे. आतापर्यंत १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी अर्जही दाखल केले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी, वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थी गोंधळात आहेत. सोमवारी अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठकही मंत्रालयात पार पडली. मात्र आमच्याकडे दहावीच्या निकालाचा डेटा आला असून तो अपलोड होऊन वेळापत्रक जाहीर होण्यास २ ते ३ दिवस लागतील, अशी माहिती अहिरे यांनी दिली.विद्यार्थ्यांचे नुकसानदहावीच्या निकालाची तारीख घोषित झाल्यापासूनच अकरावी प्रवेशाची तयारी शिक्षण विभागाने करायला हवी. मात्र दरवर्षी तीच तयारी करण्यासाठी सरकारला वेळ का लागतो, हा प्रश्न उपस्थित होतो. बाकी प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली तरी ती नेहमीप्रमाणे तीन महिने चालणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होतेच, यात वाद नाही.- वैशाली बाफना, संचालिका, सिस्कॉम संस्था.