Join us

‘मिशन होप’मध्ये डॉ. दीपक म्हैसकर यांचे कोरोनासंबंधी व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:06 AM

मुंबई, : मालाड येथील जनसेवा समिती संचलित श्री. एम. डी. शाह महिला महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘मिशन होप’अंतर्गत व्याख्यानमालेत आयएएस ...

मुंबई, : मालाड येथील जनसेवा समिती संचलित श्री. एम. डी. शाह महिला महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘मिशन होप’अंतर्गत व्याख्यानमालेत आयएएस अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसकर यांनी कोरोनासंबंधी विस्तृत असे मार्गदर्शन केले.

कोरोनाच्या उगमापासून ते सध्याच्या या महामारीत कशी काळजी घ्यावी, यासंबंधी सूक्ष्म व विस्तृत अशी त्यांनी माहिती दिली.

मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, व्हॅक्सिनचा वापर करणे या चतु:सूत्रींचा वापर केल्यास आपण सहज कोरोनावर मात करू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना भारतावर कशा पद्धतीने पसरला, कोरोना पसरू नये यासाठी घ्यावयाची काळजी, कोविड झाल्यानंतर विलगीकरण, तसेच तेव्हा घ्यावयाची काळजी. आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह व निगेटिव्ह आल्यास घ्यावयाची खबरदारी, सध्याच्या काळात प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, म्युकरमायकोसिसबद्दल कशी काळजी घ्यावी व आता येणाऱ्या तिसऱ्या लाटेत आपल्या मुलांना कसे सांभाळावे इ. अशा अनेक विषयांवर अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केले.

कोरोनाला आता न घाबरता दक्षता घेऊन त्याला सामोरे गेले पाहिजे, पालकांनी मुलांसमोर जबाबदारीने वागले पाहिजे, म्हणजे मुलेसुद्धा जबाबदारीने तेच अनुकरण करतील, असे डॉ. दीपक म्हैसकर यांनी आवर्जून सांगितले.

या वेबिनारच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा शर्मा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जनसेवा समितीचे अध्यक्ष डॉ. मोहनभाई पटेल हे देखील उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ. रंजनबेन मणियार, पर्यवेक्षक शुभा आचार्या आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा. राणा व प्रा. मानसी घुले यांनी केले तर, शेवटी विविध प्रश्नोत्तरे होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

----------------------------