- अश्विनी भिडेसध्या मेट्रो- ३ प्रकल्पाची परिस्थिती काय आहे? प्रकल्प कधी पूर्ण होणार?आता मेट्रो- ३ प्रकल्पाचे मिशन २०२१ झाले आहे. २ वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. मात्र, या मधल्या २ वर्षांतील ५ ते ६ महिन्यांसाठी आमच्यावर वृक्षतोडीसाठी बंदी होती. त्याच्यामुळे आमच्या मिशन २०२०ला थोडा वेळ लागला आणि ५ ते ६ महिने काम थांबल्यामुळे ते काम भरून काढण्यासाठी आम्हाला मुदतीपेक्षा आणखी ६ महिने तरी लागतील. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला मुळातच काही करता येत नाही. न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करायला आम्हाला सुरुवातच करता आली नाही. मुळात ही बंदी फेब्रुवारी, २०१७ ते मे, २०१७ पर्यंत होत्या. त्यानंतर, सुप्रीम कोर्टाने आमच्यावरील बंदी उठविली, पण त्यानंतर पावसाला सुरुवात होत असल्याने, त्यापूर्वी प्रकल्पामध्ये केल्या जाणाऱ्या कामाच्या नियोजनात थोडा उशीर झाला. यामध्ये फेज १ मध्ये सिप्झपासून ते बीकेसीपर्यंत जून, २०२१ आणि त्याच्यापुढचा टप्पा हा डिसेंबर, २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आमचे टार्गेट आहे. अजूनही कामांबाबत काही बंदी आहेत. आरे कारशेडचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे, तसेच आरेतील २० हेक्टरमधल्या १० हेक्टरमधील आमची कामे पूर्ण आहेत, पण पुढच्या ५ हेक्टरमधील झाडे कापण्यासाठी अजून परवानगी मिळालेली नाही. त्या परवानग्यांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. कदाचित, ही परवानगी २ महिन्यांत मिळण्याची शक्यता आहे. साधारण २ वर्षे आरे कारडेपो बनण्यात जाईल. सध्या २०१८ सुरू आहे. त्यामुळे परवानग्या मिळाल्यानंतर डिसेंबर, २०२१ पर्यंत हा प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
मेट्रो - ३ प्रकल्पाच्या कामाच्या दरम्यान ज्यांच्या जागा गेल्या आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मेट्रो प्रशासनाने किती टक्के सोडविला आहे?उत्तर - पुनर्वसन आणि जमीन हे एकमेकांशी निगडित असे विषय आहेत. या प्रकल्पाच्या १०० टक्के पैकी ९९.९९ टक्के जमीन आता आमच्या ताब्यात आली आहे. थोड्या-फार प्रमाणात गिरगांव आणि काळबादेवी परिसरामध्ये जी जमीन आमच्याकडे यायची राहिली आहे, तिच्याच हस्तांतरणाचे काम सध्या सुरू आहे. एकूण २,८८८ बांधकामांचे पुनर्वसन करायचे आहे. त्यातील २,२०० बांधकामे झोपडपट्टीतील असून, ६८८ बांधकामे ही काळबादेवीमधील आहेत, यातील २,२०० झोपडपट्टीतील बांधकामांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. पुनर्वसनामध्ये काही तांत्रिक अडचणी असतात. काहींची नावे यादीत नसतात, काहींची दुसºयांच्या नावावर असतात. त्यामुळे यावर कोर्टात अपील केली जातात. मात्र, या तांत्रिक बाजू लवकरात लवकर सोडविल्या जातात. त्यामुळे २,२०० झोपडपट्टीतील बांधकामे ही पूर्ण करण्यात आले आहेत. काळबादेवीमध्ये एकूण १९ इमारतींतील रहिवाशांचे पुनर्वसन करायचे आहे. हे दोन भागांत करण्यात येणार आहे. यातील १९ इमारतींमधील २ इमारतींची प्रकल्पाच्या जागेनुसार आता गरज नाहीये. आता यातील १३ इमारतींचे पुनर्वसन पूर्ण झाले असून, यातील रहिवाशांना इतर ठिकाणी हलविण्याचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे ७५ ते ८० टक्के पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले आहे आणि राहिलेले २५ टक्के कामही प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे पुनर्वसनाचे काम आम्ही बºयापैकी पूर्ण केलेले आहे.
मेट्रो प्रकल्प हा भूमिगत आहे, पण त्याचे बरचसे काम अजून वरच सुरू आहे. याने मुंबईकरांना भेडसावणाºया वाहतुकीच्या समस्येबाबत तुम्ही काय सांगाल?हा प्रकल्प जरी भूमिगत असला, तरी भूमिगत जाऊन काम करण्यासाठी वरूनच खाली जावे लागणार आहे, नाहीतर काम होणार कसे? मुंबईत रस्त्याव्यतिरिक्त भूमिगत जाण्यासाठी अशा कोठेही जागा नाहीत. त्यामुळे या प्रकल्पातील २६ पैकी २० स्थानके ही मुंबईतील रस्त्याच्या खालीच आहेत. जवळपास ६ स्थानके ही थोडा रस्त्याचा भाग आणि थोडी भूमिगत अशी आहेत. त्यामुळे ही स्थानके बांधायची असतील, तर रस्त्यांवरती खोदूनच आपल्याला भूमिगत जावे लागणार आहे. २५० मीटर लांब आणि २५ मीटर रुंद हा जो एका स्थानकाचा बॉक्स आहे, तो कापण्यासाठी आहे. त्या रस्त्यांवरून कापूनच खाली जावे लागतेय. त्यासाठी संपूर्ण रस्ता आम्हाला एकाच वेळी कधीच मिळत नाही. त्यामुळे टप्प्याटप्पात ही कामे अगदी काळजीपूर्वक आणि सुरक्षेच्या दृष्टीने करावी लागतात, पण रस्त्यांच्या खालची स्थानके भूमिगत जाऊन खोदून झाली आहे. त्यामुळे हे सर्व रस्ते मोकळे झाले आहेत. कारण महत्त्वाचे काम आता आमचे पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्या भागातील वाहतुकीची समस्या आता दूर करण्यात आली आहे. त्यामुळे खोदकाम होईपर्यंत थोडे दिवस ही समस्या राहणार, पण हा प्रकल्प होण्यासाठी आम्हाला खोदकाम हे रस्त्यांवरूनच करावे लागते. मात्र, एकदा खोदकाम पूर्ण झाले की, मग हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण मोेकळा करण्यात येतो.
वाहतुकीची समस्या फक्त मेट्रो-३ मुळेच होतेय, असे नाहीये. शहरात वाहनेही वाढतायत. लोकसंख्याही प्रचंड वाढतेय. शहरात १० टक्के वाहने विकत घेण्याची संख्याही वाढलीय. आहेत. त्यामुळे वाहतूक समस्याही मेट्रोच्या कामांमुळे होत नाहीये. मात्र, हे प्रकल्प झाल्यावर ही समस्या काही प्रमाणात कमी होण्याचे प्रमाणही वाढणार आहे आणि वाहतुकीसाठी मेट्रोे-३चा एक भूमिगत पर्याय उभा राहणार आहे, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.वृक्षतोडीचा प्रश्न हा कितपत सुटला आहे?वृक्षतोडीचा प्रश्न भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे. वृक्ष प्राधिकरणाकडे एखादा वृक्षतोडीचा प्रश्न जातो. मात्र, यासाठी ६ महिन्याचा कालावधी जातो. यात काही तांत्रिक गोष्टी असतात. त्यामुळे जी झाडे आम्ही तोडतो. त्या बदल्यात चांगल्या प्रतीची, १२ फुटांची चांगली झाडे प्राधिकरणाकडून लावली जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी हा प्रश्न सुटलेला आहे. या प्रकल्पात आरे डेपोसाठी २,७०० आणि बाकी प्रकल्पांत २,८०० अशी साधारण ६,०००च्या आसपास काही झाडांचे प्रत्यारोपण आणि काही झाडांची आपण झाटणी केली आहे. त्या झाडांच्या बदल्यात आम्ही ३ पटीने म्हणजे २५,००० चांगल्या प्रतीची झाड नवीन लावली आहेत. पुढची ७ वर्षे आम्ही त्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी घेणार आहोत. त्याची सर्व आर्थिक जबाबदारी मेट्रो प्रशासनाची आहे. यातील ३०० ते ४०० झाडे सोडली, तर बाकी सर्व झाडे ही आरे भागातील आहेत. तेथील सामाजिक संस्थांची मदत घेऊन, आम्ही त्या भागातील सर्व झाडे लावली असून, त्यांची योेग्य ती निगा घेतली जाईल.
(शब्दांकन : अजय परचुरे)