मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिशन शक्तीचं कौतुक केलं आहे. काही वेळापूर्वीच वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला तीन मिनिटांत पाडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही वैज्ञानिकांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. मिशन शक्ती आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. जवान असो की शास्त्रज्ञ, प्रत्येक जण आपली कामगिरी बजावत असतो. त्यांना सरकारच्या पाठबळाची गरज असते. हे पाठबळ सरकार देत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. टायमिंगला कधीच टायमिंग नसतं. निवडणुका येत-जात असतात, देशाची प्रगती थांबता कामा नये. कोण याकडे कुठल्या नजरेने पाहतं यावर सगळं अवलंबून आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्यानं भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं आहे. यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं.