Join us

सरकारी रुग्णालयांत ‘मिशन थायरॉइड’; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:44 AM

मिशन थायरॉइडअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ओपीडीमध्ये फिजिशियन, सर्जन, इंडोक्रोनोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट व बायोकेमिस्ट अशा विविध तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.

मुंबई :  राज्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांत ३० मार्चपासून ‘मिशन थायरॉइड अभियान’ राबविण्यात येईल. याअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी १२ वाजता औषध वैद्यकशास्त्र विभागांतर्गत विशेष थायरॉइड ओपीडी चालविली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मिशन थायरॉइडअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ओपीडीमध्ये फिजिशियन, सर्जन, इंडोक्रोनोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट व बायोकेमिस्ट अशा विविध तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. थायरॉइडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व बऱ्याच दृश्य स्वरूपातील थायरॉइडच्या विविध परिणामांवर जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉइडचे विविध कॅन्सर यासंबंधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

थायरॉइडची लक्षणे

प्रत्येकी १ लाख महिलांमागे अंदाजे २००० महिलांना दृश्य स्वरूपात थायरॉइडची गाठ मानेवर दिसून येते. थायरॉइडग्रस्त महिला आणि पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे असतात. थायरॉइड ग्रंथींच्या अतिस्त्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे अथवा अंधत्वदेखील येऊ शकते.

टॅग्स :गिरीश महाजन