स्वतंत्र लसीकरण केंद्र : जनजागृतीच्या माध्यमातून प्रतिसाद वाढवण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रसार मुंबईसाठी मोठे आव्हान ठरू शकते. यासाठी या परिसरात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र पहिल्या दिवशी या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे महापालिकेची पंचाईत झाली आहे. त्यामुळे पथनाट्य, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
सुमारे अडीच चौरस किलोमीटर परिसरात साडेआठ लाख लोक दाटीवाटीने राहतात. अशा या धारावी परिसरात कोरोनाचा प्रसार रोखण्यास पालिकेला गेल्या वर्षी यश आले होते. परंतु गेल्या महिन्यापासून धारावीमध्ये पुन्हा बाधित रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. सध्या या भागात १९२ सक्रिय रुग्ण आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने येथे स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केले आहे. छोटे सायन रुग्णालय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रात सोमवारपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे.
या केंद्रात पाच बूथ स्थापन करण्यात आले असून दिवसाला पाचशे लोकांना डोस देणे शक्य आहे. तर येथील एक लाख ७० हजार नागरिक साठ वर्षांवरील आहेत. मात्र पहिल्या दिवशी केवळ ६४ धारावीकरांनी लस घेतली. त्यामुळे लोकांना लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने आता नगरसेवक, आरोग्य सेवक यांची मदत घेतली आहे. तसेच धारावी कोळीवाडा येथे मंगळवारी पथनाट्य सादर करून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करण्यात आले.
विकेंडला गर्दी होण्याची अपेक्षा...
धारावीमध्ये वास्तव्य करणारे रोजंदारीवर काम करतात. एक दिवसाची सुट्टी घेऊन लस घेण्यास जाणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे शनिवार व रविवार या दोन सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी केंद्रावर गर्दी होण्याची पालिकेला अपेक्षा आहे.
दिवसभरात आढळले २८ रुग्ण
धारावीमध्ये मंगळवारी २८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा आता १९२ झाला आहे. तर दादरमध्ये ३४ बाधित सापडले आहेत. माहीम परिसरात बाधित रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये वाढला आहे. मंगळवारी सर्वाधिक ७६ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.