भूमी अभिलेख पद भरती परीक्षेच्या निकालात चुका, उमेदवारांच्या जन्मतारखेत घोळ, प्रवर्गातही गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:20 AM2023-01-30T11:20:50+5:302023-01-30T11:21:37+5:30

Exam News: राज्याच्या महसूल खात्याच्या अखत्यारितील भूमी अभिलेख विभागाकडून भू करमापक तथा लिपीक-टंकलेखक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे.

Mistakes in the results of land record post recruitment exam, confusion in the date of birth of the candidates, confusion in the category too | भूमी अभिलेख पद भरती परीक्षेच्या निकालात चुका, उमेदवारांच्या जन्मतारखेत घोळ, प्रवर्गातही गोंधळ

भूमी अभिलेख पद भरती परीक्षेच्या निकालात चुका, उमेदवारांच्या जन्मतारखेत घोळ, प्रवर्गातही गोंधळ

googlenewsNext

- दीपक भातुसे 
मुंबई : राज्याच्या महसूल खात्याच्या अखत्यारितील भूमी अभिलेख विभागाकडून भू करमापक तथा लिपीक-टंकलेखक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. मात्र या निकालात चुका असल्याने उमेदवारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महसूल खात्याच्या भूमी अभिलेख विभागात भू करमापक तथा लिपीक-टंकलेखक पदासाठी २८ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. आयबीपीएस या कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल (मेरिट लिस्ट) नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालाच्या यादीवर नजर टाकली तर त्यात उमेदवारांची जन्मतारीख, त्यांचा प्रवर्ग यात चुका असल्याचे समोर आले आहे. निकालात एका उमेदवाराचे जन्मवर्ष चक्क स्वातंत्र्यपूर्वीचे १९३२ दाखवण्यात आले आहे. तर कुणाचे १९७३ दाखवण्यात आले आहे. तर अनेक उमेदवारांनी ईडब्लूएसमधून अर्ज केला होता, त्यांचा प्रवर्ग खुला दाखवण्यात आला आहे.
ईडीब्लूएस प्रवर्गात अर्ज भरला असताना निकालात खुला प्रवर्ग दाखवण्यात आल्याने आपली नोकरीची संधी जाऊ शकते अशी भीती अनेक उमेदवारांना वाटत आहे. निकालात अशा चुका होऊच कशा होऊ शकतात असा सवाल उपस्थित करून उमेदवार या जाहीर झालेल्या निकालाबाबत साशंकता व्यक्त  करत आहेत.  

निवड सूचीत चुका टाळाव्यात : परीक्षार्थी 
भूमी अभिलेख विभागातील पदभरती परीक्षेचा हा निकाल जाहीर झाला असून आता लवकरच उमेदवारांची जात प्रवर्गनिहाय निवड सूची जाहीर केली जाणार आहे. ही निवड सूची जाहीर करताना चुका दुरुस्त कराव्यात अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

गुणांबाबतही साशंकता
भूमी अभिलेख पदभरती परीक्षेत जास्त गुण मिळालेल्या काही उमेदवारांना म्हाडाच्या परीक्षेत अत्यंत कमी गुण होते. एखाददुसऱ्या उमेदवाराबाबत हे घडू शकते, मात्र अनेक उमेदवारांबाबत हे कसे घडले असा सवाल उपस्थित करत या गुणांबाबतही काही उमेदवारांनी शंका व्यक्त केली आहे.

Web Title: Mistakes in the results of land record post recruitment exam, confusion in the date of birth of the candidates, confusion in the category too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा