लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मुंबईत वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी कलरकोड स्टिकर तयार केले आहेत, पण काहीजण कलरकोड स्टिकरचा गैरवापर करत असल्यामुळे वाहनांची गर्दी हाेऊन वाहतूक मंदावली आहे.
वाहतूक व्यवस्थेसाठी मुंबई पोलिसांनी तीन रंगांचे स्टिकर तयार केले आहेत. डॉक्टरांच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स (रुग्णवाहिका), औषधे किंवा ऑक्सिजन अथवा इतर वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करणारी वाहने यांच्यासाठी लाल रंगाचा, दूध, भाज्या, फळे, बेकरी उत्पादने यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठी हिरवा, तर मुंबई मनपा, वीज विभाग, फोन कंपन्या, मीडियासह सर्व अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी पिवळ्या रंगाचे स्टिकर खासगी वाहनांवर लावणे बंधनकारक आहे.
वाहतूक पोलिसांनी आवश्यक कारणासाठी कलर कोडचा वापर करावा असे स्पष्ट केले असले तरी अनेकजण त्याचा गैरवापर करत आहेत. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी अनेकजण अनावश्यक कारणासाठी रस्त्यावर आल्याचे आढळून आल्यामुळे पाेलीस अशांना थांबवत आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन दहिसर टोलनाका आदी ठिकाणी वाहतूक मंदावल्याचे चित्र पहायला मिळाले.
दरम्यान, कलर काेड स्टिकर अत्यावश्यक सेवेसाठी असून नागरिकांनी त्यासाठीच त्याचा वापर करावा, गैरवापर करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
......................