सिडको अधिका-याकडून सरकारी वाहनाचा गैरवापर, सहा वर्षे गाडी वापरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:01 AM2018-01-10T02:01:23+5:302018-01-10T02:01:33+5:30

नवी मुंबईतील शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाºयाने गृहरक्षक दल व नागरी संरक्षण विभागात (होमगार्ड अ‍ॅण्ड सिव्हिल डिफेन्स) कार्यरत असताना वरिष्ठांच्या परवानीविना तब्बल सहा वर्षे सरकारी वाहनांचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

The misuse of government vehicles from the CIDCO officer, used for six years | सिडको अधिका-याकडून सरकारी वाहनाचा गैरवापर, सहा वर्षे गाडी वापरली

सिडको अधिका-याकडून सरकारी वाहनाचा गैरवापर, सहा वर्षे गाडी वापरली

Next

- जमीर काझी

मुंबई : नवी मुंबईतील शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाºयाने गृहरक्षक दल व नागरी संरक्षण विभागात (होमगार्ड अ‍ॅण्ड सिव्हिल डिफेन्स) कार्यरत असताना वरिष्ठांच्या परवानीविना तब्बल सहा वर्षे सरकारी वाहनांचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कालावधीत वाहन भत्ता घेत असतानाही त्यांनी बोलेरो गाडीतून २१ हजार ७८२ किलोमीटर इतका प्रवास केला आहे. त्यासाठी शासकीय दराने २ लाख २५ हजार ३२४ रुपयांच्या वसुलीसाठी नागरी संरक्षण विभागाने सिडकोकडे पाठपुरावा केला आहे.
लक्ष्मीकांत एच. डावरे असे या अधिकाºयांचे नाव आहे. सध्या ते सिडकोत विकास अधिकारी (सामान्य) वर्ग-१ या पदावर कार्यरत आहेत. त्यापूर्वी १ जुलै २०१० ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत होमगार्ड व सिव्हिल डिफेन्स विभागाच्या ठाण्यातील कार्यालयात उपनियंत्रक म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी परवानगी नसताना निवासस्थानी आणि ठाणे-मुंबई ये-जा करण्यासाठी या सरकारी बोलेरो वापरली होती.
डावरे यांनी उपनियंत्रक पदाबरोबर काहीकाळ गृहरक्षक दलाचे समादेशक व प्रशासकीय विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. त्यांना वेतनाबरोबर दरमहा २४०० रुपये प्रवास भत्ता मिळत होता. मात्र तरीही ते नागरी संरक्षण विभागाच्या मालकीची बोलेरो (एम.एच.-०१-वाय.ए.३८१४) वापरत होते. तब्बल २५५ वेळा त्यांनी परवानगीविना वाहन वापरल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. वास्तविक त्यांना वाहन वापरण्यासाठी मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाºयांकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक होते. विकास अधिकारी (सामान्य) वर्ग-१ या पदाची परीक्षा देवून ते उत्तीर्ण झाले. उपनियंत्रक पदाचा राजीनामा देवून २० आॅक्टोबर २०१६ रोजी हजर झाले. डावरे यांच्याकडून वाहनाचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याबाबत खुलासा मागण्यात आला. त्यावर त्यांनी वाहनाचा वापर कार्यालयीन कामासाठी केला असून त्यासाठी तत्कालिन वरिष्ठ अधिकाºयांनी तोंडी परवानगी दिली होती, असे कळविले. नागरी संरक्षण विभागाचे महासमादेशक संजय पांडे यांनी तो अमान्य केला. याबाबत शासकीय दराने २ लाख २५ हजार ३२४ रुपये शुल्क वसुली करण्यासाठी सिडकोकडे सहा महिन्यांपासून पत्रव्यवहार करीत आहेत.

गृहविभागाला दिली माहिती
नागरी संरक्षण विभागात उपनियंत्रक म्हणून कार्यरत असताना डावरे वाहन भत्ता घेत असतानाही सरकारी वाहनाचा विनापरवाना वापर केल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. गृह विभागालाही त्याबाबत कळविण्यात आले आहे. त्याबाबत सिडकोकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
- संजय पांडे, महासमादेशक, गृहरक्षक दल व नागरी संरक्षण विभाग

रक्कम भरण्यास सांगितले
होमगार्ड व नागरी संरक्षण विभागाकडून आलेल्या पत्रानुसार रक्कमेचा भरणा करण्याबाबत संबंधित अधिकाºयाला कर्मिक विभागाकडून कळविण्यात आले आहे.
- भूषण गगराणी,
कार्यकारी व्यवस्थापक, सिडको

गृहविभागाकडे केले अपील
उपनियंत्रक म्हणून वाहन वापरण्यासाठी आपल्याला तत्कालीन वरिष्ठाकडून तोंडी सूचना होत्या. राजीनामा मंजूर होण्यापूर्वी या बाबी तपासायला हव्या होत्या. त्यांनी आकारलेल्या शुल्काविरोधात आपण गृह विभागाकडे अपील केले आहे.
- लक्ष्मीकांत डावरे, विकास अधिकारी (सामान्य), सिडको

Web Title: The misuse of government vehicles from the CIDCO officer, used for six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको