मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी आज पहाटे पुन्हा ईडीने छापा टाकला. सुमारे 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. माजी नगराध्यक्ष व मुश्रीफ यांचे उजवे हात समजले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्या घरीही छापा पडला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर खळबळ उडाली असून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर याअगोदरही आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. परंतु आता ईडीने धाड टाकल्याचे समजते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच, विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे पडल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफ हे बाहरेगावी आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच, एका विशिष्ठ जाती-धर्माच्या व्यक्तींवरच कारवाई होतेय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
ईडी कारवाईनंतर काय म्हणाले संजय राऊत
हसन मुश्रीफ विरोधी पक्षात आहेत. जे एका विचारधारेविरोधात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडतायेत. अनेकांना अटक झाली. हसन मुश्रीफांना तुरुंगात टाकण्याची भाषा काहींनी केली होती. ही भाषा भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याबाबतीतही झाली होती. परंतु ते सत्तेत गेल्याने त्यांना दिलासा मिळतो. विरोधकांवर दबाव टाकण्याचं राजकारण केले जाते. हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटाशी सामना करणारे नेते आहेत. ते या संकटातून बाहेर पडतील असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.