मुंबई - सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उभारण्याच्या नावाखाली ना विकास क्षेत्र आणि मिठागरांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. आधीच प्रदूषित महानगरांच्या यादीत मुंबई चौथ्या स्थानी आहे. त्यातच राज्य सरकारच्या धोरणामुळे मुंबई आणि मुंबईकरांचे भवितव्य धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही धोरणे हाणून पाडावीत, या मागणीसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच साकडे घातले आहे.पंतप्रधान मोदी यांना निरुपम यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रदूषित महानगरांच्या यादीत मुंबईला चौथे स्थान दिले आहे. अशात मुख्यमंत्र्यांची सर्व धोरणे मुंबईचा नैसर्गिक समतोल बिघडवणारी आहेत, असा आरोप निरुपम यांनी पत्रात केला आहे. बिल्डर लॉबीच्या दबावाखाली मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. आता सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारण्यासाठी मिठागरांच्या जमिनी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केल्यास मुंबईकरांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल, असा इशाराही निरुपम यांनी दिला आहे.
मिठागरांचा विकास मुंबईसाठी धोकादायक, मुंबई काँग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 6:01 AM