‘मिठी’ जीवघेणी ठरू शकते, रहिवाश्यांंचे गा-हाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 02:32 AM2020-07-05T02:32:35+5:302020-07-05T02:33:05+5:30

पावसाळ्याचा जुलै महिना आला तरी मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यांसह मिठी नदीच्या साफसफाईबाबत महापालिकेने मौन धारण केले आहे.

‘Mithi’ can be life threatening, the cries of the residents | ‘मिठी’ जीवघेणी ठरू शकते, रहिवाश्यांंचे गा-हाणे

‘मिठी’ जीवघेणी ठरू शकते, रहिवाश्यांंचे गा-हाणे

Next

मुंबई : मुंबईला हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यकतेनुसार क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे म्हणत मुंबई महापालिका सज्ज राहिली. पावसाचा जोर दुपारनंतर ओसरल्याने क्रांतीनगर आणि लगतच्या परिसरातील रहिवाशांवर तात्पुरत्या स्थलांतरणाची वेळ आली नाही. परंतु आजची वेळ टळली असली तरी पावसाळ्यात वारंवार या समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशा आशयाचा सूर उमटत आहे. दरम्यान, आता पावसाळ्याचा जुलै महिना आला तरी मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यांसह मिठी नदीच्या साफसफाईबाबत महापालिकेने मौन धारण केले आहे.

पालिकेच्या हद्दीतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरामधील मोठे नाले, मिठी नदीमधील गाळ काढण्याचे काम मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करण्यात येते. छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम संबंधित विभागीय कार्यालयांकडून करण्यात येते. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरामधील मोठ्या नाल्यातील व मिठी नदीमधील पावसाळापूर्व नालेसफाईची हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत, असा दावा महापालिकेने वारंवार केला.

नालेसफाईच्या कामांव्यतिरिक्त मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सबवेसह, ज्या सखल ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी उदंचनसंच तैनात करण्यात आलेले आहेत. नालेसफाईनंतर ज्या-ज्या वेळेस नाल्यांमध्ये तरंगते पदार्थ आढळून आल्यास सदर तरंगते पदार्थ वेळोवेळी काढण्यात येतात, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले.

स्थलांतरणाची वेळ येऊ नये
खूपच पाऊस झाला तर लगतच्या वस्तीत पाणी येते. मुसळधार पाऊस सलग लागत राहिला की मिठी नदीच्या पाण्याचा वेग वाढतो.
पाणी एवढ्या वेगाने वाहते की तो वेग बघताना अंगावर काटा उभा राहतो. परिणामी सारखी सारखी येथील रहिवाशांवर स्थलांतरणाची वेळ येऊ नये, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Web Title: ‘Mithi’ can be life threatening, the cries of the residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.