Join us

‘मिठी’ स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे! शुद्धीकरण प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 2:48 PM

असा आहे भूमिगत मलजल बोगदा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प-पॅकेज चार अंतर्गत मुंबई पालिकेने २.६० मीटर व्यास असलेल्या भूमिगत मलजल बोगद्याचे काम हाती घेतले आहे. बापट नाला आणि सफेद पूल नाल्यापासून धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पापर्यंत हा बोगदा तयार करण्यात येत असून, एकूण तीन टप्प्यांत हे काम पूर्ण होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, कुर्ला उद्यान येथे पहिल्या टप्प्यातील मलजल बोगद्याचा ‘ब्रेक-थ्रू’ घेण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.  बापट नाला आणि सफेद पूल नाल्यातून मिठी नदीत जाणारे अंदाजे १६८ दशलक्ष लिटर प्रति दिन  इतके पाणी या भूमिगत मलजल बोगद्याद्वारे धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्रात वाहून नेण्यात येणार आहे. तेथे मलजलावर प्रक्रिया करून माहीम निसर्ग उद्यान येथील खाडीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मिठी नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होणार असून, पर्यावरणाचेही संतुलन टिकून राहणार आहे.

मुंबई मलनिःसारण प्रकल्पांतर्गत हा भूमिगत मलजल बोगदा बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. कुर्ला उद्यान येथे पहिल्या टप्प्यातील मलजल बोगद्याचा ‘ब्रेक-थ्रू’ घेण्यात आला. यानंतर या प्रकल्पातील कनाकिया झिलिऑन (एससीएलआर जंक्शन), सहार-कुर्ला जोडरस्ता येथे दुसरा आणि बापट नाला येथे तिसरा टप्पा घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता ४०० दशलक्ष लिटर प्रति दिन मलजल वाहून नेण्याची आहे. सध्या यातून १६८ दशलक्ष लिटर रोज बिगरपावसाळी प्रवाह वाहून नेण्यात येणार आहे.

असा आहे भूमिगत मलजल बोगदा 

  • भूमिगत मलजल बोगद्याची एकूण लांबी ६.७० किलोमीटर असून, सरासरी खोली १५ मीटर आहे. 
  • भारतातील सर्वात लहान व्यासाचा असा हा मलजल बोगदा असून, या बोगद्याचा अंतर्गत व्यास २.६० मीटर आहे. तसेच बाह्य व्यास ३.२० मीटर आहे. 
  • या बोगद्याच्या संरेखनामध्ये  एकूण ५ शाफ्ट प्रस्तावित आहेत. १ ऑक्टोबर २०२१ पासून हा प्रकल्प सुरू असून, ४८ महिन्यांत म्हणजेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • मुंबई मलनिःसारण प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. कुर्ला उद्यान येथे या बोगद्याचा ‘ब्रेक-थ्रू’ घेण्यात आला. 

महत्त्वाच्या बाबी

  • दुसऱ्या टप्प्यातील भूमिगत बोगद्याचे खणणे कुर्ला उद्यानापासून सुरू होईल आणि लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता जंक्शन शाफ्ट, सहार-कुर्ला रस्ता येथे पूर्ण होईल. 
  • या दुसऱ्या टप्प्यातील बोगद्याची लांबी १.८० किलोमीटर इतकी असेल. 
  • यानंतर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील बोगद्याचे काम सुरू होणार आहे. 
  • अंतिम टप्प्यातील बोगदा ३.१० किलोमीटर लांबीचा राहणार असून, तो सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता जंक्शन शाफ्ट ते बापट नाला असा खोदण्यात येणार आहे. 
  • या बोगद्याची एकूण वहन क्षमता ४०० दशलक्ष लिटर प्रति दिन मलजल इतकी आहे. 
  • मात्र, सध्या त्यातून केवळ १६८ दशलक्ष लिटर प्रति दिन इतका बिगरपावसाळी प्रवाह वाहून नेण्यात येणार आहे. 
  • मुंबईतील लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेत २०५१ पर्यंतचे नियोजन केले आहे.
टॅग्स :नदीमुंबई