मिठी होतेय साफ; डासांचा प्रादुर्भाव होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:32 PM2020-04-17T13:32:31+5:302020-04-17T13:33:07+5:30

कोरोनाचा ताप त्यात डासांचा त्रास : डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उचलले पाऊल

The mithi river are clean; Infection of mosquitoes will be less | मिठी होतेय साफ; डासांचा प्रादुर्भाव होणार कमी

मिठी होतेय साफ; डासांचा प्रादुर्भाव होणार कमी

Next

 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यावर उपाय म्हणून सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता कोरोनाचा ताप कमी काय म्हणून आता डासांचाही त्रास सुरु झाला आहे. विशेषत: एल वॉर्ड म्हणजे कुर्ला येथील बहुतांशी परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून, येथील नागरिकांची निद्रा नाश झाली आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे आरोग्यही धोक्यात आले आहे. मात्र आता यावर उपाय आणि डासांचे प्रमाण वाढू नये म्हणून कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर येथील मिठी नदीच्या साफ सफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मुंबई उपनगरातून वाहत माहीम मार्गे अरबी समुद्राला मिळणारी मिठी नदी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. ही नदी नाही तर तिचा नाला झाला आहे. ठिकठिकाणी नदीत रसायन मिश्रित पाणी सोडले जात आहे. मुंबई महापालिकेकडून मिठी नदीची स्वच्छता तर केवळ नावाला केली जात आहे. या व्यतीरिक्त मिठी लगत अनधिकृत बांधकामे वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण महापालिकेने येथील अनधिकृत बांधकामांवर यापूर्वी अनेकवेळा कारवाई केली आहे. मात्र मिठी प्रदूषितच आहे. परिणामी या प्रदूषणाचा त्रास येथील स्थानिक नागरिकांना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कुर्ला येथील बैलबाजार, क्रांती नगर, संदेश नगर, वाडीया इस्टेट, सहयोग नगर या परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. हे सर्व परिसर मिठी नदीच्या किनारी वसले आहेत. येथील वाढलेल्या डासांचे प्रमाण कमी व्हावे, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सदर परिसरात वारंवार धूर फवारणी करण्यात आली, असे येथील मनसेचे स्थानिक नगरसेवक संजय तुर्डे यांनी सांगितले. मात्र डासांचे प्रमाण कमी होत नव्हते. मिठी नदीमध्ये गाळ व कचरा असल्याने विभागात डासांचे प्रमाण वाढले. धूर फवारणी केली तरीही डासांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र होते. अखेर यावर उपाय म्हणून मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी व कचरा साफ करण्यासाठी महानगरपालिकेकडून जेसीबी मागवण्यात आला आहे; आणि आता मिठी नदीची साफसफाई हाती घेतली जात आहे, असे संजय तुर्डे यांनी सांगितले.

------------------------------------

- येथील साफसफाई हाती घेण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळेल. येथील लोकप्रतिनिधी जागृत असल्याने कामे होत आहेत. मात्र आता कल्पना सिनेमासमोर, वांद्रे-कुर्ला संकुल, लाल बहादूर शास्त्री मार्ग या लगतच्या वस्त्यांमधून जेथून जेथून मिठी नदी वाहते; तेथे साफसफाई हाती घेणे गरजेचे आहे, असे कलिना विधासभेतील भाजपचे माजी सचिव राकेश पाटील यांनी सांगितले.

 

- जरीमरी, सफेद पूल, साकीनाका, पवईसह वांद्रे-कुर्ला संकुलातील काही परिसर, म्हणजे जेथे जेथे मिठी नदी वाहते; आणि जिथे जिथे अस्वच्छता आहे. गाळ आहे. अशा ठिकाणी महापालिकेने साफ सफाई सुरु करावी. जेणेकरून पावसाळ्यात अडचणी येणार नाहीत, असे म्हणणे येथील नागरिक मांडत आहेत.

Web Title: The mithi river are clean; Infection of mosquitoes will be less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.