श्रीकांत जाधव
मुंबई - मान्सून पूर्व मिठी नदीच्या साफसफाई कामाची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यानंतर कोट्यवधी रुपये खर्चून सुरू केलेल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पाहिजे. मीही पालिका आयुक्तांशी संयुक्त बैठक घेणार आहे. तसेच येत्या ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही आठवले यांनी पालिका अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
मंगळवारी वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथील मिठी नदीच्या पात्राला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष साधू कटके, मनपाचे कार्यकारी अभियंता विठ्ठल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मिठी नदी सफाईचे कंत्राट ४२ कोटी रुपये आले. पात्र १८० मीटर रुंद आहे. गाळ कचरा उपसण्याचे काम ३१ मे पर्यंत पूर्ण होईल, असा दावा संबंधित कंत्रादाराने केला आहे. मात्र २६ जुलै २००५ च्या मुंबईत महापूरात पात्रालगतच्या मुंबईकरांचे मोठे नुकसान झाले होते, मुंबईत मोठी मनुष्यहानी झाली. त्यामुळे असा संकटातुन पालिका प्रशासनाने धडा शिकून भविष्यात मुंबईत जलप्रलय होऊ नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी महत्वाकांक्षी ब्रिमस्टोवेड प्रकल्पाचे काम किती पूर्ण झाले याची माहिती घेण्यासाठी आपण लवकरच बैठक घेणार असल्याचे आठवले म्हणाले.