Join us

‘मिठी’चे खोलीकरण, रुंदीकरण होणार; तिसऱ्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 9:44 AM

१० वर्षे कंत्राट. 

मुंबई : मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे आतापर्यंत ९५ टक्के काम झाले असून संरक्षक भिंतीचे काम ही ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी पालिकेने सुरुवात केली असून पुढील १० वर्षांसाठी ३ हजार ६७ कोटी खर्च करणार असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. मिठी नदीच्या विकास व प्रदूषण नियंत्रणाच्या आराखड्याची अंमलबाजवणी ही ४ टप्प्यात प्रस्तावित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी पालिकेकडून ४५१. ७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईतच उगम पावणाऱ्या आणि मुंबईतच समुद्राला जाऊन मिळणाऱ्या मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर इतकी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र साधारणपणे ७ हजार २९५ हेक्टर एवढे आहे. २६ जुलै २००५मध्ये झालेल्या पावसानंतर पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती.  विविध टप्प्यांमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत व सेवा रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. 

अनधिकृत बांधकामांचा अडथळा :

 क्रांतीनगरच्या पुढे वाहणारी नदी कुर्ला-कलिना पुलाखालून, किस्मत नगरच्या खाली वाहते आणि सीएसटी पुलाखालून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे वाहते. या परिसरात मिठी नदी ६० मीटरपर्यंत अरुंद होते. 

 माहीमच्या खाडीजवळ येताच नदी १०० मीटर ते २२० मीटर रुंद होते; मात्र, नदीचे रुंदीकरण अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे रखडले आहे.

 अनेक वर्षांपासून पालिकेकडून ही बांधकामे हटविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आधी अशाच काही बांधकामांचे पालिकेकडून पुनर्वसन करण्यात आले असून, ती पाडण्यात आली आहेत.

तिसऱ्या टप्प्यासाठी याआधी ही निविदा प्रक्रिया झाली, मात्र  पूर्व बैठकांमध्ये अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित झाले. मिठीच्या कामाची व्याप्तीही वाढली. त्यामुळे प्रकल्पाच्या कामांचा आराखडा तयार करताना सल्लागारांना तांत्रिक अडचणींना सामोरे जाऊ नये लागू म्हणून ती निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

सीएसटी ब्रीज कुर्ला पासून ते वाकोला नदी पर्यंत समाविष्ट भागातील सुशोभीकरण करणे, मिठी नदीच्या त्या परिसराच्या पाण्यातील मलप्रवाह स्थलांतर करणे, मिठी नदीच्या बाजूला रिटेनिंग वॉल व सर्व्हिस रोड बांधणे तसेच भरती-ओहोटीच्या वेळी कोरड्या हवामानाचा प्रवाह रोखणे अशी कामे प्रस्तावित आहेत.

टॅग्स :मुंबईनगर पालिकानदी