मिठी नदी होणार पूरमुक्त; विहारचे पाणी जलशुद्धीकरण केंद्राकडे वळवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 06:34 AM2023-09-04T06:34:00+5:302023-09-04T10:39:39+5:30

मुंबईला विहार,तुळशी, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा आणि भातसा या जलस्रोतातून पाणीपुरवठा केला जातो.

Mithi river will be flood free | मिठी नदी होणार पूरमुक्त; विहारचे पाणी जलशुद्धीकरण केंद्राकडे वळवणार

मिठी नदी होणार पूरमुक्त; विहारचे पाणी जलशुद्धीकरण केंद्राकडे वळवणार

googlenewsNext

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावाची साठवण क्षमता इतर तलावांपेक्षा कमी असल्याने पावसाळ्यात विहार तलाव ओव्हरफ्लो झाल्यास ते पाणी मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे भरती आणि त्यात विहार तलावातून सोडलेले जादा पाणी यामुळे पावसाळ्यात मिठी नदीला पूर येण्याची नेहमीच भीती असते. पूर आल्यास त्याचा फटका आजूबाजूच्या परिसरालाही बसतो.  मिठी नदी पूरमुक्त करण्यासाठी  पावसाळ्यात विहार तलावातील ओव्हरफ्लो पाणी भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात वळविण्याच्या मुंबई महापालिकेच्या योजनेला वेग आला आहे.  

मुंबईला विहार,तुळशी, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा आणि भातसा या जलस्रोतातून पाणीपुरवठा केला जातो. विहार तलावाची पाणीसाठवण क्षमता ही २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर आहे. पावसाळ्यात हा तलाव त्वरित ओव्हरफ्लो होतो. जादा पाणी मिठी नदीत सोडले जाते.  परिणामी, पूरसदृश परिस्थिती होऊन त्याचा फटका कुर्ला, सायन, माहीम, माटुंगा, चुनाभट्टी, वाकोला या भागांना बसतो. यातून सुटका करण्यासाठी व उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी २०२० मध्ये सल्लागार नियुक्त केला. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी निविदा काढली आहे.

निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण 
या कामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या निविदा मूल्यांकनाचे काम सुरू आहे. साधारण दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतरच पाण्याचा योग्य वापर आणि मिठी नदी काही प्रमाणात पूरमुक्त होण्याचा दिलासा मिळेल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे जलविभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.

२०० दशलक्ष लीटर प्रति दिन अतिरिक्त पाणी
जादा पाण्याच्या योग्य वापरासाठी विहारच्या किनाऱ्यावर २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे पम्पिंग स्टेशन बांधून विहार तलावातून बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी पुढे भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाईल. त्यानंतर तेथे शुद्ध केलेले पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यातून उपलब्ध होऊन मुंबईकरांची पाण्याची आणखी गरज भागणार आहे.

Web Title: Mithi river will be flood free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई