मुंबई : प्रदूषणाच्या मगरमिठीतून मिठी नदीला मुक्त करणाऱ्या प्रकल्पाचा अखेर श्रीगणेशा होणार आहे. फिल्टरपाडा ते पवई जलविभाग यार्ड या परिसरातील १.३ कि.मी. लांबीच्या मार्गावरील सांडपाणी व मलजल रोखून त्यावरील प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी मिठी नदीत सोडण्यात येणार आहे. यासाठी नेमण्यात येणाºया ठेकेदाराला पुढील १५ वर्षे या प्रकल्पाची देखभाल करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारावर राहणार आहे.मिठी नदी स्वच्छ करण्याचे काम प्रामुख्याने चार टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मिठी नदीच्या उगमापासून म्हणजेच फिल्टरपाडा ते पवई जलविभाग यार्ड या १.३ किलोमीटर एवढ्या लांबीचे काम होणार आहे. यामध्ये मिठी नदीलगत प्रवाहरोधक बांध उभारून बिनपावसाळी सांडपाणी मलवाहिन्यांमध्ये प्रवाहित करणे, मलवाहिनी टाकणे, मलजल उदंचन केंद्र बांधणे तसेच सांडपाणी व मलजलावर प्रक्रिया करून ते मिठी नदीत सोडणे अशा कामांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदेत स्काय वे इन्फ्रा प्रोजेक्ट ही कंपनी पात्र ठरली आहे. प्रकल्प उभारून पुढील १५ वर्षे देखभालीची जबाबदारी या कंपनीवर असणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका २११ कोटी रुपये खर्च करणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित केलेल्या समितीची व मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण यांची मंजुरी मिळाल्यानंतर दुसºया, तिसºया व चौथ्या टप्प्यातील कामे हाती घेता येणार आहेत.महापालिका करणार २११ कोटी रुपये खर्च- मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर एवढी आहे. ११.८४ कि.मी. लांबीची नदी ही महापालिकेच्या अखत्यारीतील भागात असून उर्वरित सहा कि.मी. लांबीची नदी ही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अखत्यारीत येते.- या नदीचे पाणलोट क्षेत्र हे साधारणपणे सात हजार २९५ हेक्टर एवढे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणाºया विहार आणि पवई तलावांमधून होणारा विसर्ग हा या नदीचा प्रमुख जलस्रोत आहे.
प्रदूषणाच्या मगरमिठीतून होणार ‘मिठी’ नदी मुक्त; सांडपाणी, मलजलावर प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 6:07 AM