‘मिठी’ला आता पडणार २८ फ्लडगेट्सची ‘मिठी’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 10:41 AM2024-01-23T10:41:42+5:302024-01-23T10:43:43+5:30
दोन हजार कोटी खर्च.
मुंबई : समुद्रातील पाणी मिठी नदीद्वारे पुन्हा शहरात येऊ नये, यासाठी पालिका एकूण २८ ठिकाणी पूररोधक दरवाजे उभारणार आहे. त्यासाठी पालिका दोन हजार कोटी खर्च करणार आहे.
येत्या आठवड्यात फ्लडगेट्ससाठी पालिकेकडून निविदा जाहीर करण्यात येणार असून, लवकरच या संबंधीच्या प्रकल्पाला वेग देण्यात येणार आहे. यामुळे सायन, कुर्ला, चुनाभट्टी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, मिठीच्या किनाऱ्यालगत असणारी अनधिकृत बांधकामे अडथळा ठरत असल्याने प्रकल्पाला विलंब होण्याची भीती प्रशासनाला आहे. २६ जुलै, २००५च्या पावसात मुंबई पाण्याखाली गेली होती.
यावेळी १८ किलोमीटर लांब असलेल्या मिठी नदीला पूर आल्यानंतर मुंबईतील अनेक भागांत पाणी तुंबले.
त्यानंतर पालिकेने मिठी नदीचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला.
मिठी नदीतील सांडपाणी, रसायनमिश्रीत पाणी रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत.
मिठी नदीची एकूण लांबी
१७.८४ किमी
महापालिकेच्या ताब्यातील मिठी
११.८४ किमी
एकूण पाणलोट क्षेत्र
७,२९५ हेक्टर
एमएमआरडीएच्या ताब्यातील मिठी
६.०० किमी
फ्लडगेट्सचा उपयोग काय?
विहार तलावापासून माहीम खाडीपर्यंत नदी विस्तारली असून, ही नदी अंधेरी, वांद्रे, कुर्ला परिसरातून जाते. हे फ्लडगेट्स माहीम खाडीपासून सुरू होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रासह अन्य भागात बसविण्याचे नियोजन आहे.
या परिसरात फ्लडगेट्स उभारल्याने भरतीच्या वेळेस हे दरवाजे बंद केल्यास नदीतील पर्जन्य जलवाहिन्यांतून पाणी रोखण्यास मदत होईल.
ओहोटीच्या वेळेस हे दरवाजे उघडून पर्जन्य जलवाहिन्यांमधील पाणी नदीत जाण्यास मदत होईल. पाणी ओव्हरफ्लो होऊन रेल्वे रुळांवर जाणार नाही. वाहतूक सुरळीत राहील.
मिठी नदीच्या एकूण प्रवाहमार्गाच्या परिसरात झोपड्या असून, या ठिकाणाहून जलप्रवाह, सांडपाणी मिठी नदीत येते. त्याचबरोबर, मोठ्या प्रमाणावर प्लास्टीकसह विविध प्रकारचा कचरा मिठी नदीत टाकला जातो. परिणामी, अनेक भागांत मिठी नदी अक्षरशः तुंबते आणि विविध भागांत कचरा अडकून मुसळधार पावसात मिठीला पूर येतो.
मुंबईतील सांडपाणी मिठी नदीत सोडले गेल्यामुळे मिठी नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून मिठी नदीवर बसविण्यात येणारे फ्लडगेट्स याचा प्रतिबंध करण्यात मदत करतील.