26 जुलै: ‘मिठी’ आजही धडकी भरवते!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:48 AM2020-07-26T04:48:30+5:302020-07-26T04:52:35+5:30

२६ जुलै २००५ च्या पुराची भयंकर दृश्ये आजही रहिवाशांच्या डोळ्यांसमोरून जात नाहीत. मिठी नदीकाठच्याच नाही, तर संपूर्ण मुंबईला या पुराचा जबरदस्त तडाखा बसला होता.

‘Mithi’ is still shocking today! 26 july 2005 Mumbai's still same today | 26 जुलै: ‘मिठी’ आजही धडकी भरवते!

26 जुलै: ‘मिठी’ आजही धडकी भरवते!

Next

- सचिन लुंगसे

थोडी जरी अतिवृष्टी झाली तरी मिठी नदीकाठच्या रहिवाशांना धडकी भरते. संपूर्ण मुंबईला २६ जुलै २००५ च्या पुराचा फटका बसला होता. आज या घटनेला १५ वर्षे पूर्ण होत असतानाही ढिम्म प्रशासन, सुस्त लोकप्रतिनिधी आणि बेजबाबदार नागरिकांमुळे परिस्थिती फार काही सुधारलेली नाही. वरून साफ दिसणारी मिठी नदी आजही गाळात रुतल्याने मिठी नदीकाठच्या लोकांचा जीव प्रत्येक पावसाळ्यात टांगणीला लागलेला असतो.


२६ जुलै २००५ च्या पुराची भयंकर दृश्ये आजही रहिवाशांच्या डोळ्यांसमोरून जात नाहीत. मिठी नदीकाठच्याच नाही, तर संपूर्ण मुंबईला या पुराचा जबरदस्त तडाखा बसला होता. मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर अशा तिन्ही भागांतून २१.५०५ किलोमीटर लांबीचा मिठी नदीचा प्रवाह आहे.
सहा महिन्यांत मिठी नदीतून सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रिक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी बहुतांशी गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो, असा दावा महापालिकेने केला आहे. असे दावे प्रत्येक वर्षी केले जातात. त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी निधी खर्चही होत गेला. मात्र गाळ काही निघाला नाही. गाळाच्या नावावर निघाला तो कचरा. असे प्रत्येक वर्षी होत असताना लोकप्रतिनिधींनीदेखील मुंबई महापालिकेसह कंत्राटदारावर चिखलफेक सुरू केली. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. पण या वादात मिठी गाळात रुतत गेली. १ आॅगस्ट २००० रोजी ‘मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले. मात्र अद्याप समाधानकारक कामे झाली नाहीत. मिठी नदीच्या प्रकल्पावर आतापर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.


प्रत्येक पावसाळा पाण्याखाली
पुरानंतर मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मिठी नदीच्या रुंदीकरणासह खोलीकरणाचे काम तेव्हा केलेही. मात्र त्यापुढील काळात मिठी नदी हवी तशी, हव्या तेवढ्या वेगाने कधीच साफ झाली नाही. परिणामी, मिठीकाठचा परिसर प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली गेला.

तिप्पट कालावधीनंतरही
काम अर्धेसुद्धा झाले नाही

२६ जुलैच्या पुरानंतर १५ वर्षांनी आजही मिठी नदीच्या साफसफाईवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. ‘मिठी’च्या सुशोभीकरणासाठी १ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार एमएमआरडीए व मुंबई महापालिका कामाला लागली. खोलीकरणासह उर्वरित कामदेखील सुरू झाले. २०१० मध्येच हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार होता. मात्र त्यापेक्षा तिप्पट कालावधी होऊनही अजून निम्मे कामसुद्धा झालेले नाही.


टायगर हिलमधून उगम
२१ किमी लांबीची ही नदी पवईच्या ९०० फूट उंच टायगर हिलमधून उगम पावते आणि साकीनाका, कुर्ला, कालिना, वांद्रे, खार, माहिम येथून अरबी समुद्राला मिळते. पवई तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणीही मिठी नदीला जाऊन मिळते.
महापालिका
महापालिकेकडे विहार तलाव ते सीएसएमटी रोड या पुलाचा भाग देण्यात आला आहे. नदीकाठच्या बाजूने आलेल्या ११.२ किलोमीटर क्षेत्राचे खोदकाम, खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दोन किलोमीटरचा सर्व्हिस रोड बनलेला आहे; १० किलोमीटर अद्याप बाकी आहे. महापालिकेने या कामावर दोन टप्प्यांत २८.९७ कोटी आणि ५७३.८९ कोटी रुपये खर्च केले.

Web Title: ‘Mithi’ is still shocking today! 26 july 2005 Mumbai's still same today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.