मिठीला साबरमती फ्रंटचा लूक!
By admin | Published: May 23, 2014 07:59 PM2014-05-23T19:59:56+5:302014-05-24T00:10:18+5:30
मिठी नदीला साबरमती फ्रंटचा लूक मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे तसे आश्वासनच देण्यात आले आहे.
मुंबई : गाळात फसलेली, प्रदूषणाने माखलेली, २६ जुलैच्या महापूरात मुंबईला उद्धवस्त करणारी आणि नाला झालेल्या मिठी नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह महापालिकेने हातपाय मारले; पण झाले काहीच नाही. मात्र आता याच मिठी नदीला साबरमती फ्रंटचा लूक मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे तसे आश्वासनच देण्यात आले आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार पूनम महाजन मिठी नदी वाचविण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी कलिना आणि क्रांतीनगर(कुर्ला) येथील मिठीची पाहणीही केली आहे. पाहणीदरम्यान त्यांनी भविष्यात सांडपाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून मिठी नदीचे नैसर्गिक रूप कायम ठेवण्यासाठी साबरमती फ्रंटसारखा प्रयोग करता येईल का? याबाबत आपली योजना राहणार असल्याचे सांगितले आहे. एमएमआरडीएच्या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच यापुढील काळात मिठी नदीशी संबंधित सर्व यंत्रणा एका छताखाली असावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मिठीवर एकूण १२ पूल आहेत. त्यापैकी ५ पूल हे संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील जमिनीवर येत आहेत. त्यामुळे नदीच्या साफसफाई तसेच विकासाच्या बाबी क्लिष्ट होतात, असेही पूनम महाजन यांनी पाहणीदरम्यान नमुद केले. (प्रतिनिधी)
.............