कॉलेज सुरू करण्याबाबत तरुणांच्या संमिश्र प्रतिक्रिया; नियोजन करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 08:29 AM2021-08-08T08:29:12+5:302021-08-08T08:29:31+5:30
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांमध्ये अजूनही कोरोनाची भीती कायम असल्याचे दिसून येत आहे. तर काही विद्यार्थी कधी एकदा कॉलेज सुरू होते असे म्हणत आहेत. तर पालकांमध्येदेखील अशाच प्रकारची संभ्रमावस्था दिसून येत आहे.
- ओमकार गावंड
मुंबई : राज्यातील विविध शहरांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याने आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये कॉलेज सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. मात्र कॉलेज सुरू करण्याबाबत तरुणांमधून अद्यापही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांमध्ये अजूनही कोरोनाची भीती कायम असल्याचे दिसून येत आहे. तर काही विद्यार्थी कधी एकदा कॉलेज सुरू होते असे म्हणत आहेत. तर पालकांमध्येदेखील अशाच प्रकारची संभ्रमावस्था दिसून येत आहे.
कॉलेज सुरू करण्याबाबत तरुणांना काय वाटते?
कोरोनामुळे दीड वर्ष कॉलेजचे तोंड पाहिले नाही. कॉलेजची मज्जा निराळीच असते. मित्रांना भेटणे, बोलणे, विचारांची देवाण-घेवाण हे देखील बंद झाले आहे. आता कुठे तरी आपण कोरोनामधून सावरतोय त्यामुळे तातडीने कॉलेज सुरू करणे गरजेचे नाही. सर्वांचे लसीकरण झाले पाहिजे अन्यथा तिसरी लाट येण्यास वेळ लागणार नाही.
- शुभम गोठणकर, रुईया महाविद्यालय
परराज्यातून तसेच परदेशातून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतील. त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग वाढला तर त्याला जबाबदार सरकारच असेल. नियोजनशिवाय महाविद्यालये सुरू करू नयेत.
- राधा जाधव, डी. वाय. पाटील महाविद्यालय
सकाळीच कॉलेजच्या लेक्चरला जाणे नेहमीचे होते; परंतु गेल्या दीड वर्षांपासून सवय मोडली आहे. सततच्या ऑनलाइन लेक्चरमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी भरलेले वर्ग बरे असे वाटू लागले आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर द्यायला हवा.
- समीक्षा भोसले, एसएनडीटी महाविद्यालय
कॉलेज सुरू करायचे असल्यास आधी लोकल सुरू करावी लागेल. मुंबई अजून कोरोनामुक्त झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात कोरोनाचे भय आहे. त्यामुळे कॉलेज सुरू करायचे असल्यास संभाव्य तिसरी लाट तसेच कोरोना नियमाविषयी सर्व उपाययोजना करूनच निर्णय घ्यावा.
- विशाल गायकवाड, रुपारेल महाविद्यालय