सोने खरेदीला संमिश्र प्रतिसाद; भाववाढ झाल्याने ग्राहकांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 09:24 AM2024-04-10T09:24:56+5:302024-04-10T09:25:18+5:30

हौस हा भाग असला तरी गुंतवणूक म्हणून जास्त पाहिले जाते

Mixed response to gold buying; Due to the increase in prices, customers turned their backs | सोने खरेदीला संमिश्र प्रतिसाद; भाववाढ झाल्याने ग्राहकांनी फिरवली पाठ

सोने खरेदीला संमिश्र प्रतिसाद; भाववाढ झाल्याने ग्राहकांनी फिरवली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला उधाण येईल, असा अंदाज सराफ  बाजाराने वर्तविला असला तरी प्रत्यक्षात मात्र सोन्याच्या भावाने प्रतितोळा ६९ हजारांचा आकडा गाठल्याने ग्राहकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली.
 मागील महिन्यात सोन्याचा भाव ६०, तर आठवड्याभरापूर्वी ६३ हजारांच्या आसपास होता. आता थेट ६९ हजार एवढा भाव प्रतितोळा असल्याने बुकिंगचे प्रमाण कमी झाल्याची शक्यता आहे, असे सुवर्ण विक्रेते निर्भय सिंग यांनी सांगितले. 

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक आनंद पेडणेकर यांनी सांगितले की, हौस हा भाग असला तरी गुंतवणूक म्हणून जास्त पाहिले जाते. कारण सोने दागिना म्हणून वापरता येतो आणि पैसे वाढतात म्हणून गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जाते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीला वाढीव किंवा कमी प्रतिसाद दिला, असे म्हणण्याऐवजी संमिश्र प्रतिसाद दिला, असे म्हणता येईल. पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या मते सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांना मोठी मागणी होती. दागिन्यांच्या किमतींमुळे उत्साह कमी झालेला दिसला नाही आणि सकारात्मक वातावरण कायम राहिले. ग्राहकांनी रोजच्या वापरासाठी दागिन्यांची खरेदी केली.

डायमंड वर्क दागिन्यांवर महिला वर्गाचा भर
सराफ बाजारात दाखल होत असलेल्या ग्राहकांपैकी अनेक ग्राहक हे विवाहासाठीच्या सोनेखरेदीसाठी येत होते. यात मंगळसुत्र, बांगड्यांचा समावेश होता. १० ते ४० हजारांपर्यंतची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये कानातले, पेंडल, नथ अशा दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा समावेश होता. डायमंड वर्कचे कानातले दागिने घेण्यावर महिलांचा भर दिसून आला. पूजेसाठीच्या चांदीच्या नाण्यांची खरेदी-विक्री होत होती.

Web Title: Mixed response to gold buying; Due to the increase in prices, customers turned their backs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.