मियावाकी वने : विदेशी नाही तर देशी, स्थानिक झाडांना प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:06 AM2021-09-24T04:06:23+5:302021-09-24T04:06:23+5:30
मुंबई : मुंबई महापालिका विविध सामाजिक सेवाभावी संस्थांच्या मदतीने मुंबई शहर आणि उपनगरात मियावाकी पद्धतीचे जंगल उभे करत आहे. ...
मुंबई : मुंबई महापालिका विविध सामाजिक सेवाभावी संस्थांच्या मदतीने मुंबई शहर आणि उपनगरात मियावाकी पद्धतीचे जंगल उभे करत आहे. मात्र, हे जंगल उभे करताना विदेशी झाडांऐवजी देशी, स्थानिक झाडांना प्राधान्य देण्यात यावे, असे म्हणणे पर्यावरण क्षेत्रातून मांडले जात आहे.
पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी यांच्या म्हणण्यानुसार, मियावाकी पद्धत शहरांंमध्ये खूप परिणामकारक आहे. शहरांत जागा कमी असते. परिणामी पारंपरिक पद्धतीने झाडे लावायची म्हटली तर फार कमी झाडे लावता येतात. शिवाय अशी झाडेदेखील वाढण्यास वेळ लागतो. आपल्याला लगेच परिणाम हवे असतील तर मियावाकी पद्धत उपयोगी आहे. मोकळ्या जागांवर मियावाकी जंगल उभे राहणार असेल तर तसा तोटा काही नाही. मात्र, ज्या ठिकाणी जंगल आहे, तेथे असा प्रयोग करणे योग्य राहणार नाही. कारण जंगलांमध्ये जी जैवविविधता वाढते तशी जैवविविधता मग तयार होणार नाही किंवा वाढणार नाही.
सुशांत बळी यांच्या मते, झाडे वाढली पाहिजेत. मात्र आपण आपल्या जंगलांचे संवर्धनदेखील केले पाहिजे. आपण देशी झाडे लावली पाहिजेत. मियावाकी झाडे लावताना आपण आपल्या आहे त्या जंगलांकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. अशी जंगले तयार करताना आपण स्थानिक झाडांना प्राधान्य दिले पाहिजे. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले स्वप्निल पाथरे यांच्या म्हणण्यानुसार, मियावाकीमध्ये बहुतांश ठिकाणी अजून परिणाम मिळायचे बाकी आहेत. आता आपण पहिल्या टप्प्यात आहोत. आणखी पाच वर्षांनी परिणाम पाहण्यास मिळतील. तेव्हा आपल्याला काय तोटा आणि फायदा आहे हे समजेल. मात्र, सामाजिक वनीकरण करताना देशी झाडे वापरली पाहिजेत.