ऑक्सिजन वाढविण्यासाठी मियावाकी वृक्षलागवड; राणीच्या बागेत २५ व्या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 03:20 AM2020-02-01T03:20:32+5:302020-02-01T03:21:41+5:30
भायखळा येथील प्रदर्शनात सुमारे ५० पेक्षा अधिक वृक्षसंवर्धन संस्थांचा सहभाग आहे.
मुंबई : वातावरणातील कार्बनडाय आॅक्साइडचे वाढलेले प्रमाण कमी करून आॅक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी महानगरपालिका मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात मियावाकी पद्धतीच्या वृक्षलागवडीवर भर देत आहे; याअंतर्गत येणाऱ्या एका उपक्रमाचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात २५ व्या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यानविद्याविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
भायखळा येथील प्रदर्शनात सुमारे ५० पेक्षा अधिक वृक्षसंवर्धन संस्थांचा सहभाग आहे. झाडे, फुले, फळे आणि भाज्यांचे प्रदर्शन ५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी विनाशुल्क खुले आहे. या प्रदर्शनात माझी मुंबई या संकल्पनेतील विविध पुरातन वास्तूंच्या प्रतिकृती यामध्ये मुंबई विद्यापीठ, सीएसएमटी स्टेशन, जुनी ट्राम, बेस्ट बस तसेच म्हातारीचा बुट यासारख्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच फळझाडे, फळभाज्या, परड्या, टोपल्या, कुंड्यांमध्ये वाढविलेली मोसमी/हंगामी फुलझाडे, कुंड्यांमधील झाडे, गुलाब, वेली, झुलत्या परडीतील झाडे, शोभिवंत झाडे, औषधी व सुगंधी वनस्पती, बागेतील निसर्गरचना, कलात्मक पुष्परचना आदी संकल्पना साकारण्यात आल्या आहेत.
निसर्गाशी मैत्री वाढविणारे हे प्रदर्शन आहे. प्रत्येक मुंबईकर नागरिकाने या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे मागील २४ वर्षांपासून हे प्रदर्शन दरवर्षी भरविण्यात येते. दरवर्षी या प्रदर्शनात नावीन्य व कल्पकता असते. प्रत्येक जण घरच्या आपल्या स्वयंपाकघरात तसेच टेरेसवर गार्डन तयार करून सेंद्रीय अन्न तयार करू शकतो. मुंबईकरांना झाडे, फुले, फळे आदींचे आकर्षण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यावश्यक आहे. - किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
महापालिका झाडे, फळे, फुले, भाज्यांचे प्रदर्शन चांगल्या प्रकारे आयोजित करीत आहे. गतवर्षी दीड लाख नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या वर्षी मुंबईचे सौंदर्य अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रदर्शनाची तारीख वाढविण्यात आली आहे. हे प्रदर्शन ५ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
- उमेश माने, अध्यक्ष, बाजार व उद्यान समिती