“कुणालाही थांबवायचा प्रयत्न केला नाही, आता नवीन फळी तयार झाली”: आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:01 IST2025-01-08T10:58:40+5:302025-01-08T11:01:51+5:30
Aaditya Thackeray News: यापुढेही कोणाला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

“कुणालाही थांबवायचा प्रयत्न केला नाही, आता नवीन फळी तयार झाली”: आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
Aaditya Thackeray News: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे राजकीय पक्षांनी मोर्चा वळवल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका कधीही लागू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार ठाकरे गट करत असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असून, नेते, पदाधिकारी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये मुंबईत प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल हे दोन माजी नगरसेवक आणि पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट या तीन माजी नगरसेविकांचा समावेश आहे. उद्धव सेनेच्या वरिष्ठांकडून पक्ष वाढीसाठी कोणतेही निर्णय घेतले जात नाही असा आरोप करून यातील माजी नगरसेवकांनी पक्ष सोडत असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. सोशल मीडिया अकाउंट वरून या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन दिवसांमध्येच यातील तीन नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केल्याचे शिवसेना ठाकरे पक्षाने जाहीर केले होते. ठाकरे गटाला खिंडार पडत असल्याबाबत तसेच पक्षातील नेत्यांच्या नाराजीबाबत आमदार आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
कुणालाही थांबवायचा प्रयत्न केला नाही, आता नवीन फळी तयार झाली
गेल्या अडीच वर्षांत आणि आताही आम्ही कुणालाही थांबण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही. कारण काही स्वार्थी लोक आहेत, जे काही मिळवण्यासाठी तिथे जात असतील. ज्यांना मुंबईची काळजी नाही, मराठी माणसाची, महाराष्ट्राची काळजी नाही, अशा लोकांना आम्हाला आमच्यासोबत ठेवण्यात काहीही रस नाही. आमच्यासोबत एक चांगली नवीन फळी तयार झाली आहे. ती तुम्ही विजयी पाहाल, असे रोखठोक मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीसोबत निवडणूक लढवावी, अशी मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. मनसे आगामी महापालिका निवडणुकीसाठी कुणासोबत तरी युती करेल अशी चर्चा झाली. याकडे तुम्ही कसे बघता असा सवाल आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी, मी तरी त्यांच्याकडे बघत नाही. मी आपल्या कामांकडे बघत असतो, असे म्हटले.