मुंबई - शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल (अंधेरी क्रीडा संकुल) हे प्रथम गरीब, निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय मुंबईकरांसाठी बहुउद्देशीय क्रीडा सुविधांच्या कल्पनेने बनवले गेले आहे. वर्षातील 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस फुटबॉलसाठी आणि जवळपास 30 दिवस शूटिंगसाठी या मैदानाचा वापर केला जात नाही. दुसरे म्हणजे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत काही राजकीय शक्तींच्या सांगण्यावरून मैदान मुंबई सिटी एफसी फुटबॉल क्लबच्या वापरासाठी राखीव आहे. त्यामुळे हे मैदान जरी फुटबॉलसाठी राखीव ठेवतांना केवळ काही उच्चभ्रूंसाठीच नाही तर संपूर्ण शहरातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय फुटबॉलपटूंसाठी पालिकेने घालून दिलेल्या आचारसंहितेनुसार खुले करावे.तसेच येथील अनियमतता दूर करा अशी मागणी अंधेरी पश्चिम येथील भाजप आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
आज सकाळी स्थानिक नागरिक आणि पालिका आयुक्त( उद्याने) किशोर गांधी आणि ललित कला प्रतिष्ठानचे सचिव-विशेष कार्यकारी अधिकारी गोडसे यांच्यासमवेत येथील विविध अनियमिततांबाबत संयुक्त भेट घेतली. त्यांच्याकडे येथील अनियमितता दूर करण्या संदर्भात मागण्या केल्या. यामध्ये बुकिंग ऑनलाइन करा, येथील वॉकर्सना फुटबॉल आणि शूटिंगच्या दिवसात आणि कार्यक्रमाच्या एक किंवा 2 दिवस आधी आणि नंतर देखील चालण्यापासून प्रतिबंधित केले जाते. त्यामुळे वर्षातील एकूण 120 दिवस वॉकर्सना मनाई आहे आणि त्यामुळे फुटबॉल सामना आणि शूटिंग प्रत्यक्षात होत असल्याखेरीज चालणाऱ्यांना मनाई केली जाऊ नये, जलतरण तलावाचे दर पालिकेच्या दराशी सुसंगत नसून ते पालिकेच्या इतर जलतरण दरांच्या बरोबरीने करा, तलावाच्या संदर्भात काही देखभाल समस्या असून यामध्ये पाण्याची गुणवत्ता आणि तुटलेल्या फरशा या समस्या सोडवाव्यात. या ठिकाणी एक कंत्राटदार असून ज्याची मुदत संपली असतांना तो विवाहसोहळ्यासाठी हॉल भाड्याने देतो आणि प्ले कोर्ट आणि कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या 28 खोल्या देखील भाड्याने देतो. त्यामुळे केवळ हॉलसाठी नवीन पारदर्शक बोली प्रक्रिया सुरू करावी आणि प्ले कोर्ट आणि खोल्यांचे बुकिंग थेट पालिकेने ऑनलाइन करावे, संकुलातील कर्मचार्यांची कोविड कालावधीसाठीची पगाराची थकबाकी प्रलंबित आहे आणि योग्य प्रक्रियेचे पालन केल्यानंतर ते लवकरच मंजूर करावे आदी मागण्यांकडे आपण प्राधान्याने लक्ष देवून त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार अमित साटमयांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.