मुंबई - गेल्या काही दिवसांत नियंत्रण कक्षातील खोट्या कॉलची खणखण वाढत असतानाच, बुधवारच्या कॉलने यंत्रणांची भलतीच धावाधाव झाली. कॉलरने "हॅलो, मला दोघांनी आमदार आशिष शेलार यांना गोळी मारून जीवे मारण्यास सांगितले आहे. मला मदत हवी" म्हणताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसर पिंजून काढत कॉलधारका पर्यंत पोहचताच, तो मुंबईत झालेल्या ९३ बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि माफीचा साक्षीदार निघाला. त्याच्या चौकशीत समोर आलेल्या कारणाने पोलिसांनाही डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी मंजुर अहमद मेहमुद कुरेशी (५२) याला अटक केली आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात रात्री 8.58 मिनिटांने आलेल्या कॉलने खळबळ उडाली. "परवेझ कुरेशी व जावेद कुरेशी यांनी आमदार आशिष शेलार यांना गोळी मारण्यास सांगितले आहे तरी मदत हवी आहे" असे सांगताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा, आरोपी दारूच्या नशेत दिसून आला. धक्कादायक बाब म्हणजे परवेझ आणि जावेदने दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मंजुर अहमद मेहमुद कुरेशी (५२) याने हा खोटा कॉल केल्याची माहिती समोर आली. कुरेशी हा मुंबई १९९३ बॉम्बस्फोटमधील मधील माफीचा साक्षीदार असून शिक्षा भोगुन आलेला आरोपी आहे. त्याला याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी रात्री उशिराने त्याला अटक करत अधिक तपास करत आहे. कुरेशी हा वांद्रे परिसरात राहण्यास आहे.
दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून कॉल...
आरोपीने दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून कॉल केल्याचे समोर आले. तसेच तो मुंबईच्या ९३ बॉम्बस्फोटमधील मधील माफीचा साक्षीदार असून शिक्षा भोगुन आलेला आरोपी असल्याच्या वृत्ताला निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत बच्चा राम शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.