मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाचे पुणे येथील संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याशी मोबाइलवरून अर्वाच्य भाषेत संभाषण करणारे हिंगोली येथील आमदार संतोष बांगर यांचा राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग संघटना यांनी निषेध केला. तसेच बांगर यांना समज द्यावी, अशी लेखी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग संघटना यांनी याप्रकरणी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बंधपत्रित, कंत्राटी अथवा बाह्य यंत्रणेमार्फत अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागातील जनतेस आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. परंतु या सर्वांना वेतनासाठी अनुदान वेळेवर प्राप्त होत नाही. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. आरोग्य संचालनालयाकडून अनावधानाने आमदार बांगर यांचा भ्रमणध्वनी न घेतल्याने संबंधित आमदारांनी अधिकाऱ्यांबाबत प्रसार माध्यमांसमोर अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यामुळे याचा डॉक्टर संघटना निषेध करीत असून अन्य संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
मी ॲम्ब्युलन्सवरील वाहनचालकांच्या वेतनाविषयी असणाऱ्या प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांना फोन केला होता. या कर्मचाऱ्यांचे ठरलेले वेतन वेळेवर दिले जात नाही. त्यांना १९,९०० इतके तुटपुंजे वेतन दिले जाते. जर उद्या राज्यातील सर्व वाहनचालकांनी संप केला, तर गरिबांना सेवा कोण देणार? मी सर्वसामान्यांसाठी काम करणारा आमदार आहे.- संतोष बांगर, आमदार