Join us

आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं; 'बाळासाहेबांची शिवसेना' याच नावाने आम्ही पुढे जाऊ, शिंदे गटाची प्रतिक्रिया

By मुकेश चव्हाण | Published: October 10, 2022 8:36 PM

आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.

मुंबई- राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विषयावर आज निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशा दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे नव्या नावांचे आणि चिन्हाचे पर्याय दिले होते. त्यापैकी, उद्धव ठाकरेंच्या गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' असे नाव देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाले आहे. 

गद्दार म्हणणाऱ्या ४० लोकांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात; दीपक केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

निवडणूक आयोगाने नुकताच या संबधी निर्णय जाहीर केल्याची माहिती आहे. याशिवाय, उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाने दावा केलेल्या तीनही पक्षचिन्हांवर निवडणूक आयोगाने नकारघंटा दिली. त्यांनी आता उद्या दुपारपर्यंत, नव्याने ३ चिन्हांचा पर्याय देण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नावात आम्ही समाधानी आहोत. बाळासाहेबांची शिवसेना असंच आम्हाला नाव पाहिजे होतं आणि तेच नाव आम्हाला मिळालं आहे. याच नावाने आम्ही पुढे जाऊ. लोकांच्या मनातील नाव आम्हाला मिळालं आहे, असं भरत गोगावले म्हणाले. तसेच आत कोणतंही चिन्हं मिळालं तरी हरकत नाही, असं भरत गोगावले यांनी सांगितलं.

दरम्यान, ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हासाठी धगधगती मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे तीन पर्याय देण्यात आले होते. पण त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हे चिन्ह देता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह याआधीच डीएमके पक्षाचं आहे. त्यामुळे हेही चिन्ह फेटाळून लावण्यात आलं. तर ठाकरे गटानं सुचवलेला तिसरा पर्याय म्हणजेच मशाल चिन्हाला निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे.  

शिंदे गटाला नव्यानं चिन्हं सुचवण्याचे आदेश-

दुसरीकडे शिंदे गटानंही ठाकरे गटावर कुरघोडी करत त्रिशुळ, उगवता सूर्य आणि गदा हे तीन पर्याय सूचविण्यात आले होते. शिंदे गटाचे हे तिनही पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळून लावले आहेत. शिंदे गटाला पुन्हा एकदा निवडणूक चिन्हाचे पर्याय सादर करण्याची संधी दिली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना