- मनोहर कुंभेजकरमुंबई - मुंबईत एक चौ किमी परिसरात 26000 नागरिक तर परदेशात एक चौ किमी परिसरात 100 नागरिक राहतात.मुंबईत 1000 नागरिकांसाठी 0.03 मीटर म्हणजे 300 फूट इतकीच मोकळी जागा आहे. परदेशाचा विचार केला तर लंडन मध्ये 31पट,न्यूयॉर्क मध्ये 27 पट इतक्या मोकळ्या जागा आहेत.मुंबईत मोकळ्या जागा उपलब्ध होणे ही कठीण गोष्ट असतांना मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी वर्सोव्यात 11 एकरचे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल उभारून मोठे काम केले हे कौतुकास्पद आहे. हे मुंबईतील सर्वात मोठे क्रीडा संकुल असून काम फक्त भाजपाच करू शकते असे गौरवोद्गार मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार यांनी काल सायंकाळी वर्सोव्यात काढले.
या क्रीडांगणात सर्व क्रीडा सुविधा,जॉगिंग ट्रक त्यांनी उपलब्ध करून दिला असून येथून युवकांना ऊर्जा मिळून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू येथून निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी गेल्या 10 वर्षात वर्सोव्याचा खऱ्या अर्थाने विकास केला असून त्यांच्या मागे वर्सोव्याच्या जनतेने खंबीरपणे उभे राहून त्यांना आशिर्वाद द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट असे आवाहन अँड.आशिष शेलार यांनी वर्सोवाकरांना केले.
वर्सोवा,विरा देसाई येथील या उद्यानाचा लोकपर्ण सोहळा आशिष शेलार यांच्या हस्ते झाला.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड, जेष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी,माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर,माजी नगरसेविका रंजना पाटील आणि येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या प्रास्ताविक भाषणात आमदार डॉ.भारती लव्हेकर म्हणाल्या की,2034 च्या विकास नियमावलीत आरक्षण टाकत असतांना येथे खूप गृह निर्माण सोसायट्या असून येथील नागरिकांना क्रीडांगणची कमतरता आहे हे लक्षात आले.माजी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या कडे आग्रह घरत आपण येथील 11 एकरचा भूखंड क्रीडांगणासाठी पालिकेकडून आरक्षित करून घेतला. तत्कालीन आघाडी सरकारने या क्रीडांगणाच्या उभारणीत अडथळे आणले होते. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांनी या क्रीडांगणाचे पालिकेत नगरसेवक नसतांना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण करण्यात मोठे सहकार्य केल्याची माहिती त्यांनी दिली.येथे सर्व क्रीडा सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या असून लवकरच येथे कुस्तीचा आखाडा सुरू करणार आहे. येथील नागरिकांसाठी पहाटे 5 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत जॉगिंग साठी उपलब्ध असेल अशी माहिती त्यांनी दिली.
अभिनेत्री निशिगंधा वाड म्हणाल्या की, मी गेली 25 वर्षे या मतदार संघाची नागरिक असून 2014 पासून या मतदार संघात जास्तीत जास्त सुविधा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी उपलब्ध केल्या आहेत.सदर 11 एकरचे क्रीडांगण त्याचे उदाहरण आहे.त्याच्या विकासकामांना माझा मानाचा मुजरा असून विकासाची कामे सुमुहूर्त स्वरूपात उभे करणे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.