Join us  

भाजपाने त्या सर्वांची काय अवस्था केलीय तुम्ही बघताय; भास्कर जाधवांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 1:41 PM

ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी लागणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी या युतीची घोषणा केली. 

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी टीका केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर आता ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी निशाणा साधला आहे. 

भाजपाने रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे, रासपचे महादेव जानकर यांच्यासोबत युती केली. मात्र आज या सगळ्यांची अवस्था काय झाली, हे तुमच्या समोर आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की, जो मैत्री करतो व त्याला जागतो. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं. 

दरम्यान, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेना आाणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येऊन पुढची वाटचाल करावी. महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घ्यावेत. शेतकरी, आदिवासी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी एकत्र काम करावे, अशी इच्छा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी व्यक्त केली. 

'दूध का दूध, पानी का पानी' दिसेल- मंत्री गुलाबराव पाटील

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचं काम सुरु केलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील बैठका घेतायत, आमचीही कामे सुरु आहेत. भाजपाही तयारी करतेय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये त्यांची लोक कामे करताय, पण शेवटी घोडामैदान दूर नाहीय. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५-६ महिन्यात होती. त्यामध्ये 'दूध का दूध, पानी का पानी' दिसेल, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

टॅग्स :भास्कर जाधवदेवेंद्र फडणवीसशिवसेनाउद्धव ठाकरे