मुंबई - आमदार अपात्रता सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर असून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीत थेट शिवसेना पक्षप्रमुख पदावरच प्रश्न उपस्थित केला. शिवसेना पक्षाच्या पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची झालेली निवडच वैध नाही, सेनेची घटनाच अशा निवडीला परवानगी देत नाही, असा युक्तिवाद केला.
आमदार अपात्रतेच्या गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रापासून ते थेट शिवसेनेच्या घटनेपर्यंत प्रत्येक मुद्यावर बोट ठेवत सुनील प्रभू यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. प्रभू यांनीही रेकॉर्डवर आहे, खाेटे आहे यापलीकडे अधिक उत्तरे न देण्याचा पवित्रा घेतला. या उत्तरांनी हैराण जेठमलानी यांनी प्रभू यांना माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची उपमा दिली.
कारवाईचा अधिकार पक्षप्रमुखांना : प्रभूपक्षविरोधी कृत्यासाठी कारवाई करण्याआधी आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची वेळ दिली का, असा सवाल केल्यावर मला आठवत नाही एवढेच उत्तर प्रभूंनी दिले. या आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केले असेल तर त्यांना हटवणे आवश्यक असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले.