Mla Disqualification Hearing: आमदार अपात्रता प्रकरणी राज्याच्या विधिमंडळात सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या सुनावणीवेळी शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद करताना दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. मात्र, यावेळी केलेल्या वैयक्तिक टीकेवरून विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी उपस्थित आहेत. कागदपत्रे सादर करण्यासाठी शिंदे गटाने मुदतवाढ मिळावी, अशी विनंती केली होती. ती मान्य करण्यात आली असून, शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर, ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचे वाचन केले. या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रे ठाकरे गटाने सादर केली. ही साक्ष विधिमंडळाकडून नोंदवून घेण्यात आली. त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून एक मोठी स्क्रीन लावण्यात आली होती.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नाराजी
शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादादरम्यान खडाजंगी पाहायला मिळाली. वकिलांच्या दोघांच्या वैयक्तिक टीका टिप्पणीवरून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. व्यक्तिगत टीका करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असे म्हणत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यातील वैयक्तिक टीकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली. सर्व युक्तिवाद व आक्षेप हे रेकॉर्डवर घेतले जात असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.