मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद असलेले आमदारसुनील प्रभू यांची उलटतपासणी करण्यात येत आहे. उलटतपासणीदरम्यान शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रश्नांची सरबत्ती करत सुनील प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न केला. तसंच काही प्रश्नांवरून दोघांमध्ये खडाजंगी उडाल्याचंही पाहायला मिळालं.
"विधान परिषद निवडणुकीनंतर बैठकीसाठी तुम्ही आमदारांना व्हिप स्वतःच्या अधिकारात काढला होता का? पक्षप्रमुखांनी तुम्हाला लिखित स्वरूपात सूचना केली होती का? जेव्हा तुम्ही व्हिप जारी केला तेव्हा तुमच्यासोबत कोणकोणते आमदार होते?" असे एकामागून एक प्रश्न महेश जेठमलानी यांच्याकडून सुनील प्रभूंना विचारण्यात आले. त्यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे देताना प्रभू यांनी ही सगळी माहिती रेकॉर्डवर असल्याचे सांगितले. मात्र तुम्ही प्रतिज्ञापत्र जरी दिलं असलं आणि हे सगळं रेकॉर्डवर असलं तरीही या प्रतिज्ञापत्राची शहानिशा करण्यासाठी साक्ष उलट साक्ष नोंद करत आहोत, असं विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रभू यांना उद्देशून सांगितलं. त्यानंतर सुनील प्रभू यांनी शिंदे गटाच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरं देण्यास सुरुवात केली.
व्हिपच्या तारखेवरून महेश जेठमलानी यांनी प्रश्न विचारल्यानंतर सुनील प्रभू यांनी म्हटलं की, "मी आधीच सांगितलं आहे की, व्हिप जारी केला ती वेळ रात्री साडे अकरा ते १२ या दरम्यानची होती. त्यामुळे मी व्हिपवर दुसऱ्या दिवशीची म्हणजेच २१ जूनची तारीख टाकली आणि व्हिप बजावण्यास सुरुवात केली."
भाषेवरूनही झाला होता संघर्ष
सुनावणीत काल सुनील प्रभू आणि महेश जेठमलानी यांच्यात भाषेवरून खडाजंगी उडाली होती. प्रभू हे मराठी भाषेसाठी आग्रही राहिले. त्यावर दाखल केलेली याचिका इंग्रजीत असल्याचा मुद्दा जेठमलानी यांनी उपस्थित केला. ही याचिका व शपथपत्र दाखल करताना वकिलांकडून समजून घेतले का, या प्रश्नावर वकिलांना मराठीतून काय हवे ते सांगितले आणि त्यानुसार त्यांनी ड्राफ्ट तयार करून पुन्हा मला समजावून सांगितला, असे प्रभू यांनी सांगितले. पण इंग्रजी भाषेत असल्याने तुम्ही न वाचता सही केली, असे समजायचे का? असा सवाल जेठमलानी यांनी केला तेव्हा “मी अशिक्षित नाही. अडीच लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. मराठी भाषेत मी कॉन्फिडन्ट आहे. त्यामुळे इंग्रजीतील प्रत्येक शब्द मी ॲड. असिम सरोदे यांच्याकडून समजावून घेतला आणि मग सही केली”, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली.