मुंबई - जोगेश्वरी स्थानकात लवकरच पश्चिमेच्या दिशेला एक सरकता जिना लवकरच उभारण्यात येणार आहे. वर्सोव्याच्या भाजपा आमदार आणि महिला व बालकांचे हक्क व कल्याण समिती अध्यक्ष डॉ. भारती लव्हेकर यांनी जोगेश्वरी स्थानाकामध्ये प्रवाशांची क्षमता आणि प्रवासी संख्येमुळे पादचारी पूलावर येणारा ताण लक्षात घेता या स्थानकामध्ये सरकते जिने बांधावेत अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल व तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कडे वारंवार केली होती.त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन जोगेश्वरी पश्चिमेला लवकरच एक सरकता जिना बसवण्यात येणार असल्याचे 11 जुलै 2018 चे लेखी पत्र पियुष गोयल यांनी आपल्याला दिले असल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
जोगेश्वरी रेल्वे स्थानकातील उंचावरील पूलामुळे गर्भवती महिला, व जेष्ठ नागरिक व रेल्वे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकते जीने आणि अन्य सुविधा देऊन याचे रुपडे पालटण्यासाठीची मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे गेल्या फेब्रुवारीत वर्सोवा फेस्टिवल मध्ये केली होती.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मागणी करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे अखेर आपल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून सध्या 1 सरकता जिना बसवण्यात येणार आहे.तर उत्तरेकडील पादचारी पूल आणि १ सरकता जिना दक्षिणेकडील पादचारी पूलावर बांधण्यात यावा अशी मागणी आपण रेल्वे मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती डॉ.लव्हेकर यांनी दिली.
पश्चिम उपनगरांचा विस्तार होत असताना जोगेश्वरी रेल्वे स्थानक आणि परिसरातील लोकवस्ती प्रचंड प्रमाणात वाढत गेली आहे. जोगेश्वरी स्थानकामधील ब्रीज उंचावर बांधण्यात आला असून तिकीट तसेच कूपन्ससाठी या ब्रीजवर चढावेच लागते.त्यामुळे तिकीट घर व कूपन मशीन प्लॅटफॉर्मवर उघडण्यात यावी. ब्रिज वर चढण्यासाठी लिफ्ट बसवण्यात यावी.रेल्वे स्थानकाला संरक्षक कुंपण भिंत बांधण्यात आली नसल्याने प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे क्रॉसिंग करतात त्यामुळे रस्ता आणि रेल्वे रूळ यांच्या दरम्यान कुंपण भिंत बांधण्यात यावी अशीही मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केली आहे.
२९ सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेच्या २९ स्थानकांवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे सरकते जिने उभारण्यात येणार आहेत.यामध्ये वर्सोवा विधानसभेतील आपल्या मतदार संघातील जोगेश्वरी स्थानकाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी आपण केली होती असे आमदार डॉ.लव्हेकर यांनी शेवटी सांगितले.