गाडी पुढे घेतली नाही म्हणून आमदाराच्या चालकाला मारहाण; बाउन्सरवर मारहाणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:44 AM2023-04-11T03:44:56+5:302023-04-11T03:46:21+5:30

गाडी हळूहळू पुढे घेत असल्याच्या रागात आमदार रवींद्र फाटक यांच्या चालकाला लोअर परळ येथील ओपो पबच्या बाहेर बाउन्सरसह सुरक्षा रक्षकाने मारहाण केली आहे.

MLA driver beaten up for not taking the car forward Allegation of assault on bouncer | गाडी पुढे घेतली नाही म्हणून आमदाराच्या चालकाला मारहाण; बाउन्सरवर मारहाणीचा आरोप

गाडी पुढे घेतली नाही म्हणून आमदाराच्या चालकाला मारहाण; बाउन्सरवर मारहाणीचा आरोप

googlenewsNext

 मुंबई :

गाडी हळूहळू पुढे घेत असल्याच्या रागात आमदार रवींद्र फाटक यांच्या चालकाला लोअर परळ येथील ओपो पबच्या बाहेर बाउन्सरसह सुरक्षा रक्षकाने मारहाण केली आहे. बॉम्बे डाइंग मिलच्या बाउन्सरने ही मारहाण केल्याचा आरोप चालकाने केला आहे. याप्रकरणी रविवारी एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात चार अनोळखी  व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

वागळे इस्टेट परिसरात राहणारे तक्रारदार प्रशांत पाटील (३७) हे गेल्या ६ वर्षांपासून आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे चालक म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ एप्रिल रोजी फाटक यांचा मुलगा प्रियांश (२२) याला घेऊन ते लोअर परेल येथील बॉम्बे डाइंग मिलमधील ओपा पब येथे ११ वाजेच्या सुमारास घेऊन गेले. त्यानंतर, रात्री उशिराने दोनच्या सुमारास प्रियांश यांनी गाडीबाहेर काढण्यास सांगितली. त्यांना घेण्यासाठी पार्किंगमधून गाडी काढून ओपा पबच्या इमारतीखाली आले. तेथे मर्सिडिज घेऊन थांबले असतानाच,  पाठीमागून दोन गाड्या आल्या. त्या बॉम्बे डाइंग मिलच्या मालकाच्या मुलाला घेऊन आल्याचे समजले.

त्यापैकी गाडी क्रमांक (क्र. एमएच ०१ सीटी ५६९३ ) मधून ३ बाउन्सर खाली उतरले आणि गाडी पुढे घेण्यास सांगितले. त्यानुसार गाडी पुढेही घेतली. काही वेळातच तेथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने गाडी हळूहळू हा पुढे घेत आहे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांना प्रियांश हे गाडीकडे येत असल्याने गाडी हळू चालवत असल्याचे सांगताच, तीन बाउन्सरने गाडी मध्येच थांबवली. गाडीतून बाहेर ओढत बाउन्सरसह सुरक्षा रक्षकांनी मारहाण सुरू केली. त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करत ते प्रियांश यांना घेऊन बाहेर आले. तेथे नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना घटनाक्रम सांगून त्यांच्यासह पुन्हा घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सुरक्षा रक्षकासह बाउन्सर पसार झाल्याचे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी रविवारी पोलिस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिस अधिक तपास करत आहे.

पोलिस तपास करत आहेत
आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे विचारणा करताच, मी बाहेर होतो. बाउन्सरकडून चालकाला मारहाण झाली असून, याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, ते योग्य ती कारवाई करतील, असे त्यांनी नमूद केले. 

अद्याप अटक नाही 
चालकाच्या मारहाणप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू आहे. अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चंद्रमोरे यांनी दिली आहे. 

Web Title: MLA driver beaten up for not taking the car forward Allegation of assault on bouncer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.