मुंबई- केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर कायदेशीर हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. आज सकाळी शिंदे गटातील आमदारांनी विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदेंच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले काही सहकारी आमदारांसोबत आज विधीमंडळात आले आणि त्यांनी विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं.
भरत गोगावले यांनी विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर माध्यमाशी संवाद साधला. विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आम्ही कायदेशीररित्या पक्ष कार्यालयात प्रवेश केला आहे, असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले. तसंच याचप्रमाणे शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना भवनही ताब्यात घेतलं जाणार का? असं विचारलं असता भरत गोगावले यांनी नियमात बसणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही करू, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
भरत गोगावले यांनी आगामी अधिवेशनातील 'व्हीप'वरही भाष्य केलं आहे. अधिवेशनातील उपस्थितीबाबत आम्ही लवकरच व्हीप जारी करणार आहे. हा व्हीप सर्वांना लागू होतो, त्यातून कोणीही सूटणार नाही. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर जे कोणी निवडणून आले, मग ते ठाकरे असो की शिंदे, सर्वांनाच व्हीप लागू होणार आहे. आम्ही चुकीचं काही करणार नाही, असंही प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात या आठवड्यात सुनावणी सुरू होत आहे. त्यावरही भावनेचा हा पेंडुलम कुणीकडे कसा झुकेल, हे कळेल. या अशा वातावरणातही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या शिवसैनिकांमध्ये टोकाची अस्वस्थता आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जाणारे आनंद, उत्सव आणि टीकेचे बाण या लोकांना आणखी घायाळ करतील. तेव्हा आता खरी कसोटी शिंदे शिवसेनेतील नेत्यांची आहे. काँग्रेसमध्ये राजकारणावर भाष्य करताना विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे, काँग्रेसमध्ये श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. आज हे दोन शब्द शिंदेंच्या शिवसेनेसाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत.
निवडणूक आयोगाचा निर्णय घातक-
निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. देशाचे स्वातंत्र्य संपले आहे, आता आम्ही बेबंदशाहीली सुरुवात केली आहे, असे पंतप्रधानांनी लाल किल्यावरुन जाहीर करावे. हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. चोरांना राज्यमान्यता देणे त्यांना भूषणाव वाटत असेल, पण चोर हा चोरच असतो. आज मिंध्ये गटाची आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नाव अन् चिन्ह मिळवलं; एकनाथ शिंदेंचं आता नवीन लक्ष्य-
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवल्यानंतर आता पुन्हा ते उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरेंची जिथे निर्विवाद सत्ता आहे अशा मुंबई महापालिकेत जोरदार धक्का देण्याची तयारी एकनाथ शिंदेंनी केली असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचं पुढचं लक्ष्य मुंबईतले ठाकरे गटाचे नगरसेवक आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिंदे गटात आणण्यासाठी खास रणनिती आखण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे आता पुन्हा एक नवीन आव्हान उभे राहणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"