लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आमदार निधी तीन कोटी रुपयांहून ४ कोटी रुपये करण्यात येत असल्याची महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. कोरोनाच्या संकटकाळात आमदारांच्या वेतनात केलेली ३० टक्के कपात मागे घेत असल्याचे व १ मार्चपासून त्यांचे वेतन पूर्ववत करण्यात येत असल्याचेही अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात जाहीर केले.
अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची आठवण करून दिली होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, आमच्यापैकी कोणा एकाचे सरकार आले असते तर जाहीरनामा लागू केला असता; पण आता तीन पक्षांचे सरकार म्हटल्यानंतर काही जुळवाजुळव काटछाट करावी लागते. जादूची कांडी फिरवल्यासारखे काही होत नाही.